वीज निर्मिती प्रकल्पातील आग प्रकरणात औद्योगिक सहसंचालकांचे ताशेरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:18 AM2021-03-28T04:18:15+5:302021-03-28T04:18:15+5:30
पारस: पारस वीज निर्मिती प्रकल्पातील कोल मिल आग प्रकरणी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक व अकोला विभागीय अधिकारी ...
पारस: पारस वीज निर्मिती प्रकल्पातील कोल मिल आग प्रकरणी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक व अकोला विभागीय अधिकारी व्ही.जे. निकोले यांनी शनिवारी प्रकल्पातील कोल मिलमध्ये लागलेल्या आगीची पाहणी केली. यावेळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक व अकोला विभागीय अधिकारी व्ही.जे. निकोले यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढून आगीच्या घटनेला अधिकाऱ्यांचा र्दुलक्षितपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले. याबाबत अहवाल तयार करून कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
पारस येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील चार नंबरच्या कोल मिलला २६ मार्च रोजी अचानक आग लागली. आगीच्या घटनेची दखल घेत, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक व अकोला विभागीय अधिकारी व्ही.जे. निकोले यांनी शनिवारी तातडीने पारस येथील वीज निर्मिती केंद्रात दाखल होऊन कोल मिल परिसराची पाहाणी केली. यावेळी त्यांच्या पाहणीत, कोल मिलला अनेक ठिकाणी लिकेजेस असल्याचे निदर्शनास आले. निकोले यांनी, आगीच्या घटनेस, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असल्याचे सांगितले. कोल मिलच्या आग प्रकरणात मात्र, संबंधित विभाग प्रमुखाचे नाव अद्यापही समोर आले नाही. वीज निर्मिती प्रकल्पाच्या मुख्य अभियंता विठ्ठल खटारे हे जबाबदार अधिकारी असल्यावरही कोल मिल आगीच माहिती देण्यास टाळाटाळ करुन, त्यांनी अग्नीशमन विभागाचे अधिकारी, कोल मिलमध्ये कर्तव्यावरील अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यास सांगितले. संबंधित कोल मिलचा कंत्राट दिला असल्याची माहितीही समोर आली आहे. यामध्ये अधिकारी वर्ग कंत्राटदाराला पाठिशी घालत असल्याची बाब समोर येत आहे. येथे असणारे कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीचेही गौडबंगाल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
प्रदूषण विभागाने ठोठावला दोन लाखांचा दंड!
प्रदूषण विभागाने पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राला काही महिन्यांपूर्वीच दोन लाख रुपये दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, प्रदूषण रोखण्यासाठी प्रकल्पाकडून कोट्यावधी रुपये खर्ची घातले जात असल्यानंतरही प्रकल्पातील प्रदूषण रोखण्यात येथील मुख्य अभियंता व संबंधित विभागाचे अधिकारी अपयशी ठरले आहेत. पारस प्रकल्पातील अनेक विभागात घोळ आहेत. त्यामुळे येथील अनेक घटनांची माहिती सातत्याने दडविली जाते.