टॅक्स वसुली; आज मुंबईत बैठक
By admin | Published: April 20, 2017 01:43 AM2017-04-20T01:43:02+5:302017-04-20T01:43:02+5:30
नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी उद्या गुरुवारी बैठकीचे आयोजन केले आहे. बुधवारी रात्री मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यासह इतर अधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
मनपा आयुक्त, अधिकारी रवाना
अकोला : मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नात घसघशीत वाढ होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. ही वाढ नेमकी कशामुळे होईल, आजपर्यंत वाढ न होण्याची कारणे कोणती, यासंदर्भात सविस्तर चर्चा करून मनपाने केलेल्या पुनर्मूल्यांकनाचे सादरीकरण पाहण्यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी उद्या गुरुवारी बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीसाठी बुधवारी रात्री मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यासह इतर अधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
मनपाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्तांचे १९९८ पासून पुनर्मूल्यांकनच झाले नाही. २००२ मध्ये मालमत्ता कराच्या रकमेत वाढ केल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांपर्यंत कर दरवाढीला प्रशासनासह पदाधिकाऱ्यांनी ठेंगा दाखविल्याचे चित्र आहे. आजवर मालमत्ता कर विभागाच्या दप्तरी ७४ हजार मालमत्ताधारकांची नोंद होती. त्यापासून केवळ १६ ते १८ कोटी रुपये वार्षिक कर वसुली होत असे. शहरात मालमत्तांचे प्रमाण अधिक असतानादेखील मनपाच्या उत्पन्नात वाढ होत नसल्याचे पाहून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे शहरातील मालमत्तांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. स्थापत्य कन्सलटन्सीला मालमत्तांचे सर्वेक्षण व संगणकीकृत नोंदी करण्याचे काम देण्यात आले. कंपनीच्या सर्व्हेनुसार नवीन प्रभाग वगळून शहरात १ लाख ५ हजारांच्या आसपास मालमत्तांची नोंद करण्यात आली आहे. मालमत्ताधारकांवर आकारल्या जाणाऱ्या कर प्रणालीपासून मनपाच्या उत्पन्नात सुमारे ६० ते ७० कोटींची वाढ होण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर वसूल होत असेल, तर त्याची कारणे काय, आदी बाबींवर प्रकाशझोत टाकण्यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी मनपा आयुक्तांना मुंबईत पाचारण केले आहे. बुधवारी सायंकाळी मनपा आयुक्त अजय लहाने, स्थापत्य कन्सलटन्सीचे अमोल डोईफोडे, कर अधीक्षक विजय पारतवार मुंबईसाठी रवाना झाले.