राज्यात बालकांवरही टीबीचे संकट; वर्षभरात ६०० पेक्षा जास्त बालकांना टीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 02:16 PM2019-07-10T14:16:30+5:302019-07-10T14:19:14+5:30

गत वर्षभरात राज्यात ० ते १ वर्ष वयोगटातील ६५९ बालकांना टीबी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

TB crisis; TB in 600 children in a year | राज्यात बालकांवरही टीबीचे संकट; वर्षभरात ६०० पेक्षा जास्त बालकांना टीबी

राज्यात बालकांवरही टीबीचे संकट; वर्षभरात ६०० पेक्षा जास्त बालकांना टीबी

Next
ठळक मुद्दे ० ते १ वर्ष वयोगटातील ६५९ बालकांना टीबी असल्याचे म्हटले आहे. क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.अनेक रुग्णांपर्यंत या योजना पोहोचत नसल्याने क्षय रोगाचे हे संकट वाढत आहे.


अकोला: पोलिओनंतर टीबीच्या समूळ उच्चाटनासाठी शासनामार्फत विशेष प्रयत्न सुरू असतानाच, राज्यात बालकांवर क्षयरोगाचे संकट ओढवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गत वर्षभरात राज्यात ० ते १ वर्ष वयोगटातील ६५९ बालकांना टीबी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री यांनी विधान परिषदेत अहवाल सादर केला होता. बालकांमध्ये क्षयरोगाचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब असून, या संदर्भात जनजागृतीची गरज आहे.
देशभरात टीबीच्या रुग्णांची संख्या वाढत असून, यामध्ये बालकांचा समावेश लक्षणीय आहे. या संदर्भात विधान परिषदेत आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या एका अहवालानुसार, राज्यात मार्च २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत ० ते १ वर्ष वयोगटातील ६५९ बालकांना टीबी असल्याचे म्हटले आहे. देशभरात झपाट्याने वाढणाऱ्या क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत; मात्र अनेक रुग्णांपर्यंत या योजना पोहोचत नसल्याने क्षय रोगाचे हे संकट वाढत आहे.

बालकांमध्ये टीबीची प्रमुख कारणे

  • गर्भवतींना क्षयरोग असल्यास मुलांना जन्मत:च क्षयरोग होण्याची शक्यता.
  • कुटुंबात किंवा शेजारी टीबीचा रुग्ण असल्यास संसर्गामुळे.
  • रोग प्रतिकारकशक्ती कमी असल्यास ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना टीबीचा धोका.


ही आहेत लक्षणे

  • दोन आठवड्यांपेक्षा जास्त ताप
  • वजन कमी होणे
  • भूक कमी लागणे
  • चालताना किंवा बसल्यावर दम लागणे
  • बेशुद्ध पडणे


अशी घ्या काळजी

  • पालकांनी जन्मत: बाळाला बीसीजी लस द्यावी
  • लवकरच निदान करून औषधोपचार सुरू करावेत
  • जास्त काळ ताप असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
  • उपचार अर्धवट सोडू नये



क्षयरोगाचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब असली, तरी शासनातर्फे त्याच्या समूळ नायनाटासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. कुटुंबात किंवा जवळपासच्या परिसरात क्षयरोगाची लक्षणे रुग्णामध्ये आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. कुपोषित बालकांमध्येही क्षयरुग्णांची संख्या लक्षणीय असून, या बालकांवर विशेष लक्ष दिल्या जात आहे.
- डॉ. मेघा गोळ, जिल्हा क्षयरोग अधिकारी, अकोला.

 

Web Title: TB crisis; TB in 600 children in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.