चहा विक्रेत्याची मुलगी बनली राष्ट्रीय ‘बाॅक्सर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:20 AM2021-08-29T04:20:43+5:302021-08-29T04:20:43+5:30

रवी दामोदर अकोला : जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून कोणतेही काम करायचे ठरवते, तेव्हा अशी कोणतीच शक्ती नाही जी ...

Tea seller's daughter becomes national 'boxer'! | चहा विक्रेत्याची मुलगी बनली राष्ट्रीय ‘बाॅक्सर’!

चहा विक्रेत्याची मुलगी बनली राष्ट्रीय ‘बाॅक्सर’!

Next

रवी दामोदर

अकोला : जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून कोणतेही काम करायचे ठरवते, तेव्हा अशी कोणतीच शक्ती नाही जी तिला अडवू शकेल. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची, वडिलांचा चहा विक्रीचा व्यवसाय, तरीही कठोर मेहनत व जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप घेतली आहे, अकोल्याच्या कांचनने..! होय.. एका चहा विक्रेत्याची मुलगी आता राष्ट्रीय स्तरावर बॉक्सर बनली असून, जिल्ह्याचे नाव देशात चमकवित आहे.

शहरातील गीतानगर येथील रहिवासी असलेल्या कांचनने लहानपणापासूनच बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचे ठरविले. घरची परिस्थिती गरीब व हलाखीची. वडील रामदास सुरंसे हे चहा विक्रीचा व्यवसाय करतात, तसेच तिची आई मनीषा सुरंशे या हॉस्पिटलमध्ये काम करतात. अशा परिस्थितीतही अनेक अडचणींचा सामना करीत कांचनने जिल्ह्याच्या बॉक्सिंग क्षेत्रात नाव कमावले आहे. कांचन ही सेंट इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थीिनी असून, गेल्या चार वर्षांपासून ती अकोला क्रीडा प्रबोधिनी व प्रशिक्षण केंद्रात बॉक्सिंगचे धडे गिरवित आहे. तिने राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनात अनेक पदके मिळविली आहेत. तिने रायगड येथे झालेल्या सब ज्युनिअर गर्ल्स स्टेट चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड, तर हरियाणाच्या सोनिपतमध्ये आयोजित ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रजत पदक मिळविले आहे. स्कूल स्टेटमध्ये सिल्व्हर, तर ज्युनियर इंडिया कॅम्प ट्रायल्ससुद्धा तिने दिली आहे. माझे करिअर हे बॉक्सिंग असून, ही तर सुरुवात आहे. कर्तृत्वाच्या बळावर देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे माझे ध्येय असून, त्यासाठी सर्वतोपरी मेहनत मी घेणार आहे, अशी भावना कांचनने व्यक्त केली.

------------------------

‘म्हारी छोरिया छोरों से कम हैं के!’

कांचनची आई मनीषा सुरंसे या हॉस्पिटलमध्ये काम करतात व वडील रामदास सुरंसे हे चहा विक्रीचा व्यवसाय करतात. सुरुवातीला घरची परिस्थिती हलाखीची असल्याने काचंनला बॉक्सिंगसाठी विरोध झाला; मात्र तिची मेहनत व जिद्द पाहून आई मनीषा सुरंशे व वडील रामदास सुरंसे यांनी तिला पाठबळ दिले. पोटाला चिमटा घेऊन ते कांचनला हवी असलेली साधने विकत घेतात. तसेच तिचे मार्गदर्शक सतीशचंद्र भट हे मोफत प्रशिक्षण देऊन सहकार्य करतात. काचंनची मोठी बहीण स्नेहलला बारावीत ९४ टक्के गुण असून, ती सध्या ‘नीट’ची तयारी करीत आहे. आई-वडिलांनी कांचनला कधी मुलगी मानलेच नसून, ती आमचा मुलगाच आहे. कांचनने देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी, यासाठी आपण तिच्या सदैव पाठीशी असल्याचे कांचनचे आई-वडील सांगतात.

Web Title: Tea seller's daughter becomes national 'boxer'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.