चहाविक्रेत्याने गिळंकृत केला फलाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2017 02:48 AM2017-03-18T02:48:21+5:302017-03-18T02:48:21+5:30
जुन्या बसस्थानकावरील प्रकार; भरदुपारी प्रवासी शोधतात सावली.
अकोला, दि. १७- टॉवर चौकातील जुन्या बसस्थानकाचा एका फलाट एका चहाविक्रेत्याने अनधिकृतरीत्या गिळंकृत केला आहे. डोळय़ादेखत सुरू असलेल्या या प्रकाराकडे महामंडळ अधिकारी सपशेल दुर्लक्ष करीत असल्यामुळे, भर दुपारी बसण्याकरिता प्रवाशांना सावली शोधावी लागत आहे.
जिल्हय़ातील ग्रामीण भागाशी अतूट नाते असलेल्या टॉवर चौकातील जुन्या बसस्थानकावर अधिकृत व्यवसाय करण्यासाठी एसटी महामंडळाने सात जणांची कंत्राट पद्धतीने नेमणूक केली होती. त्यामध्ये बुक स्टॉल, जनरल स्टोअर, चहा विक्री, रसवंती, सलून, दूरध्वनी कक्ष व झेरॉक्स असे विविध व्यवसाय असून, त्यापैकी जी. के. तर्हाळे या चहाविक्रेत्याने चक्क बसस्थानकाचा एक फलाटच गिळंकृत केला असल्याचे चित्र आहे. अतिक्रमित फलाटावरील बाकड्यांचा उपयोग हा चहाविक्रेत्याकरवी गिर्हाईकांना बसण्यासाठी केला जातो. परिणामी, भर दुपारी वाढत्या तापमानामुळे वैतागलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी सावली शोधावी लागते. राज्यातील कुठल्याच बसस्थानकावरील फलाट अशा पद्धतीने एसटी महामंडळाने व्यावसायिक तत्त्वावर वापरण्यास अद्याप तरी परवानगी दिलेली नाही; मात्र जुन्या बसस्थानकावर सुरू असलेल्या प्रकाराकडे महामंडळ अधिकारी सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. एसटी महामंडळाला महिन्याकाठी ५ हजार ३२३ रुपये मासिक भाडे देणार्या चहाविक्रेत्याने उस गोड लागला म्हणून मुळासकट खाण्याचा प्रकार आरंभला असून, परवानगी नसतानासुद्धा अशा पद्धतीने व्यवसाय करणार्या चहाविक्रेत्यावर वरदहस्त कुणाचा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
एसटी महामंडळाने जुन्या बसस्थानकावर सात लघुव्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. त्यापोटी त्यांच्याकडून सेवाकरासहित भाडे आकारले जाते. सप्टेंबर २0१४ मध्ये मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम केली होती. त्यानंतर या व्यावसायिकांनी बसस्थानकाच्या इतर भागात आपला व्यवसाय सुरू केला. चहाविक्रेत्यासंदर्भात अद्याप आमच्याकडे कुठलीच तक्रार आलेली नाही; मात्र त्याने फलाटावर अतिक्रमण केले असल्यास निश्चितच त्याच्यावर कारवाई केली जाईल.
- सचिन क्षीरसागर, डीटीओ, अकोला