शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे शिक्षक संघटनांमध्ये आंदोलनाची चढाओढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 02:27 PM2019-12-18T14:27:55+5:302019-12-18T14:28:03+5:30
, नागपूर विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्याने शिक्षकांचे प्रश्न, मागण्यांना घेऊन अमरावती विभागातील शिक्षक संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विभागातील शिक्षक संघटना व शिक्षक नेते कामाला लागले आहेत. शिक्षकांच्या समस्या, प्रश्नांसाठी आंदोलन करण्याची चढाओढ लागली असून, नागपूर विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्याने शिक्षकांचे प्रश्न, मागण्यांना घेऊन अमरावती विभागातील शिक्षक संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
जुनी पेन्शन योजना, प्रतिविद्यार्थीप्रमाणे शिक्षकांना वेतन देण्यासाठी, शाळा एकत्रीकरणासाठी स्थापन झालेला अभ्यासगट, निवड वेतनश्रेणीचा प्रश्न, पात्र घोषित, अघोषित शाळा, महाविद्यालयांचे अनुदान, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, महाविद्यालयांना परवानगी देऊ नये, टीईटी अट शिथिल करावी, यासह इतर प्रश्न शिक्षकांसमोर उभे आहेत. शिक्षक संघटना केवळ नावापुरत्या आंदोलनाची भूमिका घेतात. आता अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सहा महिन्यांनी होणार आहे. या निवडणुकीसाठी अनेक शिक्षक संघटना कामाला लागल्या आहेत. निवडणुकीपुरत्याच अनेक शिक्षक संघटना आणि शिक्षक नेते उदयास येतात. निवडणूक संपली की संघटना आणि शिक्षक नेते गायब होतात. निवडणूक तोंडावर आल्यावर अचानक जिवंत झालेल्या शिक्षक संघटनांना शिक्षकांच्या प्रश्नांची, समस्यांची जाणीव होते. सध्या अमरावती विभागात शिक्षक संघटनांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. पाचही जिल्ह्यांत शिक्षक संघटना उभ्या राहिल्या असून, शिक्षकांच्या समस्यांना घेऊन या संघटना नागपूर विधिमंडळावर धरणे आंदोलन करीत आहेत. सर्वच शिक्षक संघटनांना सध्या शिक्षकांचा चांगलाच पुळका आलेल्या दिसून येत आहे.
शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि आम्हीच तुमचे तारणहार असल्याचे दर्शविण्यासाठी शिक्षक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. विभागामध्ये भाजप शिक्षक सेल, शिक्षक आघाडी, राज्य शिक्षक परिषद, विज्युक्टा, विभागीय शिक्षक संघ, शिक्षक महासंघ, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक सेना, खासगी शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना आदी संघटना सध्या आंदोलनाच्या मैदानात उतरल्या आहेत.
या सर्व संघटनांकडून या आठवड्यात नागपूर विधिमंडळावर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. शिक्षकांना आंदोलनामध्ये सहभागी करून घेण्यासाठी या संघटनांमध्ये अक्षरश: चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे; परंतु येणाऱ्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक मतदार कोणत्या शिक्षक संघटनेच्या पाठीशी उभे राहतात, कोणत्या संघटनेच्या उमेदवाराला साथ देतात, हे सांगणे सध्यातरी कठीण असले तरी, शिक्षक मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न मात्र जोरकसपणे सुरू आहेत.
निवडणूक लढविण्यासाठी या संघटना उत्सुक
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी शिक्षक आघाडीसोबतच शिक्षक महासंघ, विज्युक्टा, विमाशिसं, राज्य शिक्षक परिषद, भाजप शिक्षक सेल, विभागीय शिक्षक संघ, शिक्षक सेना आदी संघटनांचे शिक्षक नेते उत्सुक असून, या संघटनांनी शिक्षक मतदारांची नोंदणी केली आहे. या शिक्षक संघटनांपैकी काहींचे उमेदवारसुद्धा जाहीर झाले असून, हे उमेदवार पाचही जिल्ह्यांमध्ये फिरून शिक्षकांच्या भेटीगाठी घेत आहेत.