शिक्षिकेने केला तांबे, पितळ, काश्याच्या पुरातन भांड्यांचा संग्रह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:53 PM2019-05-18T12:53:18+5:302019-05-18T12:54:00+5:30
अशाच एक शिक्षिका आहेत, शैला नंदकुमार चेडे. त्यांना दुर्मीळ व पुरातन भांड्यांचा संग्रह करण्याचा अनोखा छंद आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: जीवनामध्ये प्रत्येकाला काहीतरी वेगळे करण्याची आवड असते. वेगळा छंद असतो. ही आवड, हा छंद जोपासण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. कोणी पोस्टाची तिकिटे, माचीस, देश-विदेशातील नोटा, नाणींचा संग्रह करतात तर कुणी पुरातन भांडी, छायाचित्रांचा संग्रह करतात. अशाच एक शिक्षिका आहेत, शैला नंदकुमार चेडे. त्यांना दुर्मीळ व पुरातन भांड्यांचा संग्रह करण्याचा अनोखा छंद आहे. आजमितीस त्यांच्याकडे शेकडो दुर्मीळ व पुरातन अशी तांबे, पितळ, काश्याची भांडी आहेत. गत ३५ वर्षांपासून शैला चेडे यांनी हा छंद जोपासला आहे.
शैला चेडे या महान येथील राज गिद पाटील विद्यालयात क्रीडा शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या माहेरी तांबे, पितळ, काश्याची भरपूर भांडी होती. सासरी आल्यानंतरही त्यांना, आजेसासू, सासूबार्इंकडून अनेक दुर्मीळ व पुरातन पितळ, तांबे, काश्याची भांडी मिळाली. पुढे घरगुती वापरातून ही भांडी हद्दपार होऊ लागली. तांबे, पितळ, काश्याच्या भांड्यांची जागा स्टिलच्या भाड्यांनी घेतली. घरातून हळूहळू तांबे, पितळ, काश्याची भांडी गायबच झाली. ही दुर्मीळ भांडी घरात कायम राहावी आणि त्याचा संग्रह करावा, असे शैलातार्इंच्या मनात आले आणि घरातीलच काही जुनी तांबे, पितळ, काश्याची भांडी बाहेर काढली. चकचकीत केली. एवढेच नाही, तर बाहेर कुठे गेल्या आणि त्यांना दुर्मीळ व पुरातन तांबे, पितळ, काश्याची भांडी दिसली की, त्या विकत घेऊ लागल्या. पाहता-पाहता त्यांनी शेकडो तांबे, पितळ, काश्याची भांडी गोळा केली. सध्या ही भांडी कुठेच दिसत तर नाही, शिवाय मिळतही नाहीत. त्यांच्याकडे अनेक दुर्मीळ पानपुडे, काश्याचा कोपर, वॉल हॅगिंग, ताटे, ग्लास, दिवे, फुलांच्या परड्या, पितळचे लाटणे, सराटे, घंगाळ, तांबे-पितळचे जार, सायकलीच्या लाइट-बॅटरींचा दुर्मीळ संग्रह आहे. त्यांच्याकडील हा संग्रह पाहून पुरातन काळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
मोगलकालीन नाण्यांचासुद्धा संग्रह!
शैला चेडे यांनी तांबे, पितळ, काश्याची भांडी गोळा करण्यासोबतच पुरातन नाणी गोळा करण्याचा छंदसुद्धा जोपासला आहे. त्यांच्याकडे मोगलकालीन, ब्रिटिशकालीन अनेक नाणी आहेत. भांडी व नाणी गोळा करण्याच्या कामी त्यांचे पती डॉ. नंदकुमार चेडे, दोन मुलीसुद्धा मदत करतात.
‘बॅटरी’शिवाय मिळायचा नाही सायकलचा परवाना!
शैलातार्इंकडे स्वातंत्र्यपूर्व काळातील सायकलींचे लाइट-बॅटरीसुद्धा आहेत. पूर्वीच्या काळात सायकल घ्यायची असेल तर त्याला लाइट-बॅटरी असावीच लागायची. त्याशिवाय सायकलचा परवाना मिळत नसायचा, अशी माहितीही त्यांनी दिली.