रखडलेल्या शिक्षक भरतीसाठी ९ आॅगस्टचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:25 PM2019-08-03T13:25:35+5:302019-08-03T13:26:25+5:30
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीसाठी ९ आॅगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५.०० नंतर मुलाखतीशिवाय हा प्राधान्यक्रम दिलेल्या संस्थांसाठी उमेदवारांची निवडसूची प्रसिद्ध करण्यात येईल.
- संदीप वानखडे
अकोला: गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या शिक्षक भरतीसाठी शासनाला अखेर मुहूर्त सापडला असून, येत्या ९ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजेनंतर मुलाखतीशिवायची निवड यादी पवित्र पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे. तसेच १६ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजेनंतर मुलाखतीसहची निवड यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवणाऱ्या जवळपास ८५ हजार अभियोग्यताधारकांना दिलासा मिळाला आहे. याविषयीच्या सूचना २ आॅगस्ट रोजी पवित्र पोर्टलवर देण्यात आल्या आहेत.
अंतिम टप्प्यात आलेल्या शिक्षक भरतीसाठी शासनाला मुहूर्त मिळत नव्हता. पसंतीक्रम भरण्यामध्ये जवळपास दीड महिन्याचा वेळ गेल्यानंतर अभियोग्यताधारकांना निवड यादी लागण्याची प्रतीक्षा होती. जून २०१९ पर्यंत शिक्षक भरती पूर्ण करण्याचे शासनाचे नियोजन पूर्णपणे फसल्यानंतर जुलैअखेरही केवळ तारीख मिळाल्याने अभियोग्यताधारकांमध्ये रोष व्यक्त होता. २२ मेपासून प्रत्यक्षात प्राध्यान्यक्रम भरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा १ जूनपासून प्राधान्यक्रम उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर वारंवार सूचना देऊनही ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरले नाही, त्यांच्यासाठीही शासनाने तीन दिवस उपलब्ध करून देण्यात आले. पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती मराठा आरक्षणाच्या १६ टक्क्यांनुसार प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या; मात्र शासनाने मराठा आरक्षण न्यायालयाच्या आदेशानुसार १३ टक्के केल्याने तसेच दिव्यांगांनाही आरक्षण देण्याचा निर्णय झाल्याने पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती लांबण्याची शक्यता होती. अभियोग्यताधारकांनी पाठपुरावा केल्यानंतर शिक्षण विभागाने २ आॅगस्ट रोजी निवड यादी जाहीर करण्याचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच याविषयी पवित्र पोर्टलवर सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची निवड यादी जाहीर करण्याची तारीच देण्यात आली असून, ९ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर मुलाखतीशिवायची निवड यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुलाखतीसहची निवड यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे रखडलेली शिक्षक भरती मार्गी लागण्याचे संकेत असून, आॅगस्ट अखेर शिक्षक रुजू होण्याची शक्यता आहे.
मुलाखतीशिवायच्या यादीतील उमेदवारांना थेट नियुक्ती आदेश
पवित्र पोर्टलवर दोन प्रकारचे प्राधान्यक्रम अभियोग्यताधारकांकडून भरुन घेण्यात आले होते. यामध्ये मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह असे दोन प्रकार होते. यापैकी मुलाखतीशिवायमध्ये थेट गुणवत्ता यादी जाहीर होऊन उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्याचे नियोजन आहे, तसेच मुलाखतीसाठी खासगी अनुदानीत शाळा, क.महाविद्यालयांना एका जागेसाठी १० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवावे लागणार आहे. या मुलाखतीत अव्वल ठरलेल्या अभियोग्यताधारकांची निवड करण्यात येणार आहे. पहिल्या क्रमांकावरील उमेदवाराला डावलून दुसºया किंवा तिसºया क्रमांकावरील उमेदवाराची निवड केल्यास संस्थेला निवडीचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
अशा आहेत सूचना
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीसाठी ९ आॅगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५.०० नंतर मुलाखतीशिवाय हा प्राधान्यक्रम दिलेल्या संस्थांसाठी उमेदवारांची निवडसूची प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांना त्यांच्या लॉगिनवर रिपोर्ट या मेनुवर अंतर्गत सिलेक्शन स्टेटस (विदाउट इंटरह्यूव)यावर पाहता येईल, तसेच १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.०० नंतर मुलाखतीसह हा प्राधान्यक्रम दिलेल्या संस्थांसाठी उमेदवारांची मुलाखतीसाठीची निवडसूची प्रसिद्ध करण्यात येईल.