हजारो बेरोजगार शिक्षकांचे स्वप्न पूर्ण होणार; शिक्षक भरती फेब्रुवारीमध्ये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:34 PM2019-02-02T13:34:27+5:302019-02-02T13:35:07+5:30

अकोला: शिक्षक भरतीवरील बंदी उठवित शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला.

Teacher recruitment in February | हजारो बेरोजगार शिक्षकांचे स्वप्न पूर्ण होणार; शिक्षक भरती फेब्रुवारीमध्ये 

हजारो बेरोजगार शिक्षकांचे स्वप्न पूर्ण होणार; शिक्षक भरती फेब्रुवारीमध्ये 

Next

अकोला: शिक्षक भरतीवरील बंदी उठवित शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला. पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी डीएड, बीएड, एमएड बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. या नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी भरतीची प्रक्रिया निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच म्हणजेच फेब्रुवारीमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी बिंदू नामावली अद्ययावत करण्यात आल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राज्य शासनाने २0१0 पासून शिक्षक भरतीवर बंदी घातल्यामुळे शेकडो शाळांमधील हजारो शिक्षकांची पदे रिक्त होते. शिक्षक संघटना, संस्था चालकांकडून सातत्याने शिक्षक भरती सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेतली. राज्यातील १ लाख ७१ हजार ३४८ बेरोजगार शिक्षक उमेदवारांनी ही चाचणी दिली. एवढेच नाही, तर या शिक्षकांनी भरतीसाठी पवित्र पोर्टलवर माहितीसुद्धा भरली. नववर्षामध्ये बेरोजगार शिक्षक उमेदवारांना आनंदाची बातमी मिळणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांवर भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती खुद्द राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली. शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून बिंदू नामावली अद्ययावत करणे, एसईबीसी प्रवर्ग लक्षात घेऊन बिंदू नामावली विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाकडे पाठवून अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पवित्र पोर्टलवर व्यक्तिगत माहिती बदल करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. संचमान्यतेतील गटनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही शिक्षण आयुक्तांनी दिली.

निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शिक्षक भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे, रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर भरण्याचे काम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येईल.
-विशाल सोळंकी,
आयुक्त शिक्षण आयुक्त.

रिक्त पदे
- २0 हजार
पवित्र पोर्टलवर नोंदणी
-१ लाख २१ हजार ६१५
पात्र उमेदवार
- १ लाख ८ हजार ४६४

 

Web Title: Teacher recruitment in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.