शिक्षक भरती: पवित्र पोर्टलवर माहितीच अद्ययावत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:16 PM2019-03-19T13:16:47+5:302019-03-19T13:16:52+5:30
अकोला: पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी रिक्त जागांच्या शिक्षण संस्थांनी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. रिक्त जागांसाठी शिक्षक पवित्र पोर्टलवर माहिती भरत आहेत; परंतु पवित्र पोर्टल अनेक जागांची माहितीच अद्ययावत करण्यात आली नाही.
अकोला: पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी रिक्त जागांच्या शिक्षण संस्थांनी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. रिक्त जागांसाठी शिक्षक पवित्र पोर्टलवर माहिती भरत आहेत; परंतु पवित्र पोर्टल अनेक जागांची माहितीच अद्ययावत करण्यात आली नाही. तसेच सवलतींच्या बाबतीतही उमेदवार गोंधळात आहेत. शासनाने १२ हजार पदांची माहिती पवित्र पोर्टलवर दिल्याचा दावा केला आहे; परंतु प्रत्यक्षात जागा मात्र, कमी दिसत आहेत.
शिक्षक भरती सुरू झाल्यामुळे बेरोजगार शिक्षक उमेदवारांमध्ये आनंदाची लाट पसरली होती; परंतु ही हळूहळू ओसरत आहे. पवित्र पोर्टलवर उमेदवार शिक्षकांकडून माहिती भरण्यात येत आहे. शिक्षकांना अमर्याद जागा निवडण्याचे स्वातंत्र्य दिले असले तरी, काही जातींच्या जागा खूपच कमी आहेत. भटक्या जमाती, विमुक्त जाती, खुला प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीयांच्या तर बोटावर मोजण्याइतपतच जागा शिक्षण संस्थांच्या जाहिरांतीमध्ये दिसून येतात. त्यातही माजी सैनिकांसाठीही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगार शिक्षक उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरल्या गेले आहे. शासनाने पवित्र पोर्टलवर १२ हजार रिक्त जागांची माहिती दिल्याचा दावा केला आहे; परंतु प्रत्यक्षात जागा कमी दिसत आहे. तसेच शासनाने आणखी शिक्षण संस्थांच्या जाहिराती टप्प्याटप्प्याने अपलोड करण्याचे म्हटले आहे. पवित्र पोर्टलवर जागा, आरक्षण, सवलतींबाबतची माहिती अद्याप अपलोड करण्यात न आल्यामुळे शिक्षक उमेदवारांचा गोंधळ उडतो आहे. पवित्र पोर्टलवरील माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
विदर्भात सर्वात कमी जागा!
पवित्र पोर्टलवर विदर्भातील शिक्षण संस्थांच्या रिक्त जागा फारच कमी दाखविण्यात आल्या आहेत. सर्वाधिक जागा या पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण संस्थामध्ये आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये विदर्भातील उमेदवारांवर अन्याय होणार आहे. बोटावर मोजण्याइतपतच जागा विदर्भातील शिक्षण संस्थांमध्ये दाखविण्यात आल्या आहेत.
शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्यांच्या राखीव जागा दिसतच नाहीत!
शासनाने शिक्षक भरतीमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्यांसाठी एक टक्के जागा राखीव केल्या आहेत; परंतु पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या शिक्षण संस्थांच्या जाहिरातींमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्यांसाठीच्या एक टक्के जागा दिसतच नसल्यामुळे कॅटेगरीतून अर्ज करण्याशिवाय शेतकऱ्यांच्या पाल्यांना गत्यंतर नाही. शासनाने राखीव केलेल्या जागा कुठे आहेत, हे निदान दाखवावे तरी, जेणेकरून शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्यांना राखीव जागांवर अर्ज भरता येतील, असा सवाल शेतकऱ्यांच्या पाल्यांनी उपस्थित केला आहे.