शिक्षक समायोजनात ‘कही खुशी कही गम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:11 PM2019-01-22T12:11:06+5:302019-01-22T12:11:10+5:30
अकोला: विषय शिक्षकांना समुपदेशनाने नियुक्ती देण्याच्या प्रक्रियेतून शिक्षकांच्या समस्येवर समाधानकारक तोडगा निघत नसल्याचा प्रत्यय येत आहे.
अकोला: विषय शिक्षकांना समुपदेशनाने नियुक्ती देण्याच्या प्रक्रियेतून शिक्षकांच्या समस्येवर समाधानकारक तोडगा निघत नसल्याचा प्रत्यय येत आहे. समुपदेशनातून सोयीची पदस्थापना मिळत नसल्याने ३० टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षकांनी नियुक्ती आदेश नाकारल्याची माहिती आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या समुपदेशन प्रक्रियेत सुरुवातीला उर्दू शिक्षकांचा विचार केला जात आहे.
जिल्हा परिषद विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठीचे वेळापत्रक तयार करण्यात आले. त्यानुसार प्रक्रियेला सोमवारी प्रारंभ झाला. याप्रक्रियेत नियुक्तीसाठी पात्र असलेल्यांपैकी ७० टक्केपेक्षा जास्त शिक्षक सहभागी झाले. पदस्थपनेची जागा सोयीच्या नसल्याने ३० टक्के शिक्षकांनी नकार दिल्याची माहिती आहे. उद्या मंगळवारी उर्दू शिक्षकांची प्रक्रिया आहे. त्यानंतर पाच दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या ५७१ शिक्षकांची निवड होणार आहे. उर्दू माध्यमातील १२१ शिक्षकांचे विषयनिहाय समायोजन करण्यासाठी २१ व २२ जानेवारी असे दोन दिवस ठेवण्यात आले. त्यामध्ये सामाजिकशास्त्राचे १०६, भाषा-९२, विज्ञान-१७९ एवढ्या शिक्षकांचे समायोजन होणार आहे. उर्दू संवर्गात रिक्त जागांची संख्या भाषा-३१, विज्ञान-५८, सामाजिकशास्त्र-२१ आहे. तर मराठी माध्यमात विज्ञान विषयाचे शिक्षक ३९६ आहेत. त्यांच्यासाठी रिक्त जागा २८७ आहेत. समाजशास्त्र विषयासाठी २९९ शिक्षक असताना त्यांच्यासाठी ५९ जागा आहेत, तर भाषा विषयाचे ५३७ शिक्षक असताना ११६ जागा रिक्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे समुपदेशानंतर शिक्षकांवर पुन्हा एकदा अन्याय होण्याची शक्यता आहे. ही बाब लोकमतने सोमवारच्या अंकात मांडली आहे.