शिक्षकांनी स्वखर्चातून नऊ लाख रुपये गोळा करून शाळा बनविली डिजिटल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 04:37 PM2018-09-05T16:37:26+5:302018-09-05T16:38:47+5:30
अकोट येथील नगर परिषदेची परवाज उर्दू प्राथमिक शाळा येथील शिक्षकांनी स्वखर्चातून नऊ लाख रुपये गोळा करून शाळा डिजिटल बनवून तिला राज्यभर लौकिक प्राप्त केला.
- विजय शिंदे
अकोट (जि. अकोला): पगार घेतो म्हणून काम करतो, हा झाला विचार...माझे विद्यार्थी, माझी शाळा कशी प्रगत होईल, विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल, ही झाली बांधीलकी. केवळ वेतन मिळते म्हणून विद्यादानाचे काम न करता, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी झटणारे अनेक शिक्षक आहेत. त्यापैकीच अकोट येथील नगर परिषदेची परवाज उर्दू प्राथमिक शाळा एक आहे. येथील शिक्षकांनी स्वखर्चातून नऊ लाख रुपये गोळा करून शाळा डिजिटल बनवून तिला राज्यभर लौकिक प्राप्त केला.
या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी स्वत:ला वाहून घेतल्याचा सुखद अनुभव या शाळेला भेट देणाऱ्या प्रत्येकाला आल्याशिवाय राहत नाही. खासगी शाळेकडे विशेषत: इंग्लिश कॉन्व्हेंटकडे पालकांची ओढा आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद शाळा ओस पडू लागल्या आहेत. अनेक शाळा बंद पडत असल्याचे चित्र दिसून येते. अशा परिस्थितीत न.प.च्या या शाळेचे यश दीपवून टाकणारे आहे. या शाळेत १ ते ८ इयत्तेत ४९० विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत. सर्व शिक्षण अभियानांतर्गत येथे दुमजली भव्य वास्तू उभी झाली. या इमारतीतील १२ वर्गखोल्या शिक्षकांनी स्वखर्चातून नऊ लाख रुपये गोळा करून डिजिटल केल्या. ई-लर्निंग सुविधांनी शाळा सज्ज केली. या शाळेतील शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नातून शाळेचा शैक्षणिक चेहरामोहरा बदलून गेला आहे. शाळा परिसर स्वच्छ, सुंदर आहे. वर्गखोल्यांच्या भिंती भाषा, गणित, विज्ञान विषयांनी बोलक्या केल्या आहेत. ‘ज्ञानरचनावाद’ हा शिक्षण प्रक्रियेत वापरला जाणारा परवलीचा शब्द झाला आहे. या शिक्षकांनी ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा प्रभावीपणे वापर केला आहे. त्यासाठी स्वनिर्मित शैक्षणिक साधने व विविधांगी उपक्रम राबवित शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविली आहे. याचा प्रत्यय शाळेला भेट देणाºयाला आल्याशिवाय राहत नाही.
दिशा अॅपच्या निर्मिती शाळेचा सहभाग!
या शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक नजमल हुदा हे शासनाचे दिशा अॅप निर्मिती राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभागी झाले होते. हा या शाळेचा मोठा बहुमान आहे. त्यांचा पालिकेद्वारा गौरवदेखील झाला.
नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र कार्यान्वित
केंद्र शासनाच्या भारत आविष्कार अभियानांतर्गत परवाज शाळेची निवड झाली. या योजनेतून मुलांना विज्ञान व गणित विषयाची आवड व जिज्ञासा वाढावी, मुलांच्या या विषयाच्या क्षमता कौशल्याचा विकास व्हावा, या हेतूने शाळेत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र सुरू केले.
विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास
प्रत्येक मुलाचा गुणवत्ता विकास हे स्वप्न उराशी बाळगून येथील गुरु जनांकडून सामूहिक प्रयत्नातून खेळ, कला, कार्यानुभव आणि सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने घेतले जातात. शिक्षण प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर यांच्या प्रेरणेने या शाळेचे मुख्याध्यापक अफजल हुसेन, असलम खान, कलीमोदिन, मोहिबूर रहमान, अब्दुल खालीद, मुजिबूर रहमान, सै.वसीमअली नजमूलहूदा, मो.शाकीर, शमसूज्जमा, मो. अलताफ शरफ इकबाल, हबीबोद्दिन, फरहाना अंजुम, चांद बी आदी शाळेच्या प्रगतीसाठी झटत आहेत.