Teacher's Day Special : आजीने शिकविले; शिक्षक अन् ग्रंथांनी घडविले...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 10:24 AM2020-09-05T10:24:33+5:302020-09-05T10:24:44+5:30
Teacher's Day Special : वडिलांना मी नेहमी म्हणायचो, मला खाऊ नको. मला विज्ञान साहित्य व ग्रंथ पाहिजे.
- संजय उमक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : माझे बालपण आजीकडे अमरावतीच्या करजगावात गेले. शांताबाई चौधरी माझी आजी. ती शिक्षिका, तिने केलेल्या संस्कारांमुळे ती माझी पहिली गुरू, दुसऱ्या वर्गात मुरंबा या मूळ गावी राम मंदिराच्या पारावर शाळा भरत असे. चारही वर्गांना ‘गुलाबराव गुरुजी’ शिकवायचे.
गुलाबराव गुरुजी माझे आदर्श
गावात रस्त्याची सोय नसतानादेखील गुलाबराव गुरुजी चिखल तुडवत शाळेच्या वेळेत हजर असायचे. आम्हीसुद्धा त्यांची चातकासारखी वाट पाहत राहायचो. एखाद्या दिवशी गुरुजींना थोडा वेळ झाला तर आम्ही त्यांना गावच्या वेशीपर्यंत पाहायला जायचो. असे गुरू-शिष्याचे नाते दृढ झाले. गुलाबराव गुरुजी माझे आदर्श तर जगद्गुरू हे माझे प्रेरणास्रोत आहे.
वडिलांच्या श्रमाचे फलित करायचे हा संकल्प
मूर्तिजापूरच्या गाडगे महाराज विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण करून अमरावती व्हीएमव्ही महाविद्यालयात प्रवेश घेतला. वडिलांचे शिक्षण बडोदा येथे झाल्याने त्यांनी मला बडोदा येथील सयाजीराव गायकवाड विद्यापीठात दाखल केले. अनेक मुलांसोबत वसतिगृहात राहताना वेगवेगळे कडू-गोड अनुभव आले.
वडिलांच्या जीवावर मौजमजा करणारे विद्यार्थी बघितल्याने काळीज जळाले. मी तेव्हाच निर्णय घेतला वडिलांच्या श्रमाचे फलित करायचे आणि मला तिथून नवी दृष्टी मिळाली व शिक्षणाचे महत्त्व कळले. तोच माझ्या जीवनातला ‘टर्निंग पॉइंट’ ठरला.
अन् सुपर कॉम्प्युटर तयार केला...
सुपर कॉम्प्युटर ‘महासंगणक’ बुद्धी, कौशल्य, आत्मविश्वासाच्या जोरावर सहकार्याच्या मदतीने दोन वर्षात जगासमोर आणला. हा संगणक केवळ अमेरिकेकडे होता. त्याचे पेटंट ते द्यायला तयार नव्हते. तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी जबाबदारी दिली. कधीही न पाहिलेला महासंगणक तयार करणे मोठे जिकिरीचे काम होते. तरीही ते आव्हान पेलले. तीन वर्षांचा कालावधी आम्हाला दिला तो कालावधी पूर्ण व्हायच्या अगोदर कमी खर्चात तो पूर्ण केला.
खाऊ नाही ग्रंथच मागितले
वडील बाजारातून खाऊ आणायचे. वडिलांना मी नेहमी म्हणायचो, मला खाऊ नको. मला विज्ञान साहित्य व ग्रंथ पाहिजे. त्यानंतर वडील एकामागून एक विज्ञान साहित्य व ग्रंथ आणत गेले. त्या साहित्यातून व ग्रंथातून घरीच मोठी प्रयोगशाळा व ग्रंथालय उभे राहिले. या ग्रंथांनी जीवन घडविले.
घरचे वातावरण, शिक्षण, पुस्तकांचे वाचन आणि संस्कार महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वत:मधील क्षमता व आत्मविश्वास जागृत होतो. तसेच चालून आलेल्या संधीचे सोने केले पाहिजे. - पद्मश्री डॉ़ विजय भटकर