शिक्षक घडविण्याचे धडे देण्यासाठी शिक्षकच नाहीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:40 PM2017-10-01T13:40:17+5:302017-10-01T13:40:17+5:30
संजय खांडेकर
अकोला : शिक्षक घडविण्याचे धडे देणाºया अकोल्यातील शासकीय अध्यापिका विद्यालयात गत सहा महिन्यांपासून शिक्षक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासकीय अध्यापिका विद्यालयातील प्रथम वर्षाला सात आणि द्वितीय वर्षाला १४, अशा एकूण २१ विद्यार्थिनींना अभ्यासक्रमाचे धडे देण्यासाठी केवळ दोन शिक्षक आहेत. त्यामुळे अकोल्यातील अध्यापिका विद्यालयातील भावी शिक्षकांचे भवितव्य अंधारात सापडले आहे.
शासकीय अध्यापिका विद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून कधीकाळी विद्यार्थिनींमध्ये चढाओढ असायची. त्यामुळे अकोल्यातील अध्यापिका विद्यालयात प्रवेश मिळाल्याचा आनंद पूर्वी होत असे. पूर्वानुभवानुसार विद्यार्थिर्नींनी येथे प्रवेश तर मिळविला; पण त्यांचा आता भ्रमनिरास होत आहे. कारण मागील वर्षांपासून अकोल्यातील अध्यापिका विद्यालयाला कमालीची अवकळा आली आहे. यंदा डीटीएडच्या प्रथम वर्षाला केवळ सात, तर द्वितीय वर्षाला १४, असे एकूण २१ विद्यार्थिनी अध्यापिका विद्यालयात आहेत. मात्र, या विद्यार्थिनींना शिकविण्यासाठी केवळ दोनच शिक्षक येथे शिल्लक आहेत. त्यात यंदा नवीन विषयांची भर पडली असून, अभ्यासक्रमाचे धडे गिरविण्यासाठी कोणी मार्गदर्शन देणारे येथे नाहीत. दोन शिक्षकांपैकी एक शिक्षिका अमरावती येथून अप-डाउन करते, तर दुसरे शिक्षक केवळ हजेरी पटावरील स्वाक्षरीपुरता येथे आहे. शिक्षण उपसंचालकांच्या निर्देशान्वये त्यांच्याकडे जुनिअर कॉलेजसंबंधीचे कामकाज सोपविलेले आहे. त्यामुळे भावी शिक्षिकांना धडे देण्यासाठी कोणी नाही. विद्यार्थिनींना प्रॅक्टिकलचे गुण देण्याचे आमिष दाखवून केवळ थोपविले जात आहे. विद्यार्थिनींच्या पालकांनी याबाबत महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडे आणि अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली. भावी पिढी घडविण्याची जबाबदारी खांद्यावर घेणाºया भावी शिक्षिकांना शिकविण्यासाठी शिक्षक पाठवा म्हणून विनंती करण्यात आली आहे. या तक्रारीला पोहोचूनही सहा महिने झाले; पण तक्रारीची साधी दखलही कोणी घेतलेली नाही. पालकांच्या तक्रारीला शिक्षण विभागाने केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे शासकीय अध्यापिका विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २१ विद्यार्थिनी हवालदिल झाल्या आहेत. त्यांना अकोल्यातील राजकीय पुढारी तरी साथ देतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.