अशैक्षणिक कामासाठी केली जाणाऱ्या सक्तीच्या निषेधार्थ शिक्षकांचे धरणे आंदोलन
By रवी दामोदर | Published: November 10, 2023 06:03 PM2023-11-10T18:03:22+5:302023-11-10T18:04:37+5:30
नवसाक्षरता अभियानांतर्गत कोणत्याही कामाची सक्ती करू नये : शिक्षक समन्वय समितीची मागणी
अकोला : नवसाक्षरता अभियानावर राज्यभर शिक्षक संघटनांचा बहिष्कार असताना जिल्ह्यात नवसाक्षरता अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना सक्ती केल्या जात असल्याच्या निषेधार्थ शिक्षक समन्वय समितीच्यावतीने जिल्हा परिषदेच्यासमोर शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर रोजी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन शालेय शिक्षणमंत्र्यांसह जिल्हा परिषद अध्यक्षांना देण्यात आले.
याप्रसंगी शिक्षक संघटना समन्वयक समितीच्यावतीने विविध मागण्या केल्या. यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशारा शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने शिक्षणमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला. धरणे आंदोलन समन्वयक समितीचे शशिकांत गायकवाड, निमंत्रक देवानंद मोरे, समन्वय गोपल सुरे, सहनिमंत्रक श्याम कुलट, शंकर तायडे, विजय टोहरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
ह्या आहेत संघटनेच्या प्रमुख मागण्या
नवसाक्षरता अभियान अंतर्गत कोणत्याही कामाची जि. प. शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना सक्ती करू नये., नवसाक्षरता अभियानांतर्गत राबविण्याचे कार्यक्रम त्रयस्थ संस्थेमार्फत शिक्षक विभागाने राबवावे. शिक्षकांना यासाठी वेठिस धरू नये., नवसाक्षरता कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेल्या मुर्तिजापूर, बार्शीटाकळी व इतर कोणत्याही पंचायत समितीमधील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्यावर कोणतेही कार्यवाही करू नये., शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना धमकाविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या शिक्षक समन्वयक संघटनेच्यावतीने करण्यात आल्या.