शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या ‘जैसे थे’!
By admin | Published: April 18, 2017 01:41 AM2017-04-18T01:41:46+5:302017-04-18T01:41:46+5:30
आश्वासनानंतरही प्रकार सुरुच : जिल्हा परिषदेत सावळा गोंधळ
अकोला : जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये संबंधित अधिकारी मनमानीपणे शिक्षकांच्या बदल्या करतात, प्रतिनियुक्त्या देतात, या मुद्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करून कारवाईचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिल्यानंतरही हा प्रकार सर्वत्र सुरूच आहे. त्यातच बाळापूर, तेल्हारा पंचायत समितीमध्ये हा प्रकार नव्याने घडल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक १६ मार्च रोजी पार पडली. त्यावेळी बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये १४ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून केली जाईल, त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यापैकी काही-काही शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचे दाखवण्यात आले. आता त्या पुन्हा ‘जैसे थे’ केल्याची माहिती आहे. त्यामध्ये कातखेड, जामवसू, मांगुळ, झोडगा, राहित-२, दोनद खुर्द, एरंडा येथे शिक्षकांना प्रतिनियुक्त्या देण्यात आल्याची माहिती आहे. सोबतच अकोला तालुक्यातील पाटी येथील मुख्याध्यापकाबाबतही हा प्रकार घडला आहे. त्याशिवाय तेल्हारा पंचायत समितीमध्ये ८ तर बाळापूर पंचायत समितीमध्ये तीन उर्दू माध्यमातील शिक्षकांना प्रतिनियुक्त्या दिल्याची माहिती आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी उन्हाळे यांनी शिक्षिका उनोने आणि साळुंके यांच्या आंतरजिल्हा बदलीमध्ये पुणे येथून आलेल्या उनोने यांना आडसूळ येथे पदस्थापना दिली. त्या रुजू झाल्या नाहीत. उन्हाळे यांची बदली झाली. त्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांचा आदेश फिरवत उनोने यांना अकोला तालुक्यातील गोरेगाव येथे रुजू होण्याचे आदेश दिले. त्याचवेळी पदाधिकाऱ्यांनी मागणी करूनही अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली, प्रतिनियुक्तीबाबत अधिकारी बोळवण करतात, हा मुद्दाही सदस्यांनी मांडला. त्यावरही अद्यापही आदेश न झाल्याने त्याबाबत सभापतींनाच विचारणा करावी लागत आहे.