उपद्रवी आरटीआय कार्यकर्त्यास शिक्षकांनी शिकवला ‘धडा’
By Admin | Updated: January 17, 2015 01:22 IST2015-01-17T01:22:18+5:302015-01-17T01:22:18+5:30
नांदुरा येथील घटना; नाहक त्रास दिल्याने मारहाण; १0५ शिक्षक, मुख्याध्यापकांना दिवसभर धरले वेठीस.

उपद्रवी आरटीआय कार्यकर्त्यास शिक्षकांनी शिकवला ‘धडा’
नांदुरा (बुलडाणा): माहिती अधिकाराअंतर्गत अनावश्यक आणि संदिग्ध माहिती मागवून तब्बल १0५ शिक्षक, मुख्याध्यापकांना दिवसभर वेठिस धरणार्या जळगाव जिल्ह्यातील एका माहिती अधिकार कार्यकर्त्यास शिक्षकांनी शुक्रवारी चांगलाच धडा शिकवला.
जळगाव खान्देश जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील महासेन राजाराम सुरळकार यांनी नांदुरा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांची माहिती सुमारे १७ मुद्यांमध्ये मागितली होती. शिक्षण विभागाने तात्काळ सर्व संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र देवून माहिती देण्याच्या सुचना दिल्या; मात्र मुद्दे संदिग्ध असल्याने मुख्याध्यापकांनी माहितीच्या अवलोकनासाठी महासेन सुरळकार यांना आप-आपल्या शाळांवर बोलविले होते. सुरळकार त्यांना दिलेल्या कालावधीत शाळांमध्ये हजर झाले नाही. उलट त्यांनीच नांदुर्याच्या गटविकास अधिकार्यांकडे अपील दाखल केले. या अपिलावर शुक्रवारी सुनावणी होती. या सुनावणीसाठी नांदुरा तालुक्यातील सुमारे १५0 शाळांचे १0५ मुख्याध्यापक नांदुरा पंचायत समितीच्या आवारात पोहोचले. एकाचवेळी एवढे मुख्याध्यापक काम सोडून पंचायत समितीमध्ये आल्याचे पाहून, पंचायत समितीच्या पदाधिकार्यांचे लक्ष आपसूकच वेधले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची जाणीव त्यांना झाली. तालुक्यातील १0५ शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित असल्याने सुनावणी पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. सुनावणीच्या वेळी सुरळकार यांना त्यांना नेमकी कोणती माहिती हवी, हे विचारण्यात आले. या प्रश्नाचे नेमके उत्तर त्यांना देता आले नाही. सुरळकार हे जळगाव जिल्ह्याचे असताना, बुलडाणा जिल्ह्यातील शाळांची माहिती त्यांना कशासाठी हवी आहे, याबाबत विचारणा केली असता, त्याचेही उत्तर त्यांना देता आले नाही. एकूणच सावळागोंधळ लक्षात आल्याने शाळा सोडून पंचायत समितीमध्ये हजर झालेले शिक्षक, मुख्याध्यापक कमालिचे चिडले. हे शिक्षक, मुख्याध्यापक, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकार्यांनी महासेन सुरळकार यांना मारहाण केली. एवढा मोठा जमाव 'धडा' शिकवत असल्याचे पाहून, सुरळकार यांनी काढता पाय घेतला.