रस्त्यांचे तांत्रिक आॅडिट, ‘अमृत’च्या कामाची चौकशी करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 02:34 PM2018-07-24T14:34:41+5:302018-07-24T14:38:05+5:30
अकोला : शहरातील रस्ते कामांचे तांत्रिक ‘आॅडिट’ करण्यात येणार असून, अमृत योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगत, यासंदर्भात मंगळवारी नगरविकास खात्याच्या सचिवासोबत बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिली.
अकोला : शहरातील रस्ते कामांचे तांत्रिक ‘आॅडिट’ करण्यात येणार असून, अमृत योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगत, यासंदर्भात मंगळवारी नगरविकास खात्याच्या सचिवासोबत बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ सुरू करण्यात आले; मात्र, त्यासोबतच शहरातील रस्ते कामांचे तांत्रिक आॅडिट केले पाहिजे. शासन निर्णयानुसार मुंबईतील ३५० रस्ते कामांचे तांत्रिक आॅडिट करण्यात आले असून, अकोल्यातील रस्ते कामांचेही तांत्रिक आॅडिट करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. अमृत योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या पृष्ठभूमीवर अमृत योजनेंतर्गत सुरू असलेले काम निकषाप्रमाणे होत आहे की नाही, पाइपची साईज (आकार) निकषाप्रमाणे आहे की नाही, याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगत, शहरातील रस्ते कामांचे तांत्रिक आॅडिट आणि अमृत योजनेच्या कामाची चौकशी करण्यासंदर्भात मंगळवारी नगरविकास खात्याच्या सचिवासोबत बैठक घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांसंदर्भातही तक्रारी असून, त्याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर उपस्थित होते.
सिमेंट रस्त्यावर डांबरीकरण आणि पुन्हा काँक्रिटीकरण!
शहरातील रस्ते कामांसंदर्भात अनेक प्रकारच्या तक्रारी असून, त्यामध्ये पहिले सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा त्याच रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येत आहे, अशाही तक्रारी असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.
मनपाने जबाबदारी ढकलून चालणार नाही!
शहरातील रस्ते कामांसंदर्भात जिल्हाधिकाºयांनी बजावलेल्या नोटीसनुसार महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी सादर केलेल्या स्पष्टीकरणात, रस्त्यांच्या ‘क्युरिंग’ कालावधीत नागरिकांनी वाहनांची ये-जा केल्याने रस्ते खराब झाल्याचा दावा केला आहे. परंतु, रस्ते कामांसंदर्भात शहरातील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे मनपाने आपली जबाबदारी दुसºयावर ढकलून चालणार नाही, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.