'सर्व्हर'मध्ये तांत्रिक बिघाड! दीड तास उशिराने घेतला तलाठी परीक्षेचा पेपर
By संतोष येलकर | Published: August 21, 2023 04:29 PM2023-08-21T16:29:56+5:302023-08-21T16:30:11+5:30
तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेत सोमवारी सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी ९ वाजता सुरू होणारा पेपर १०.३० वाजता सुरू झाला.
अकोला : तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेत सोमवारी सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी ९ वाजता सुरू होणारा पेपर १०.३० वाजता सुरू झाला. दीड तास उशिराने पेपर घेण्यात आल्याने अकोला शहरानजीक दोन परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थी उमेदवारांमध्ये तारांबळ उडाली होती.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या तलाठी पदांच्या भरती प्रक्रियेत एका कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे. अकोला शहराजवळील बाभुळगाव आणि कापशी रोड भागात दोन केंद्रामध्ये तलाठी पदाची परीक्षा घेण्यात येत आहे. दरम्यान, सोमवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत पेपर घेण्यात येणार होता.परंतु परीक्षेच्या सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, दीड तास उशिराने पेपर सुरू झाला. सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत पेपर घेण्यात आला. तलाठी पदाच्या परीक्षेत सत्व्हार्मधील बिघाडामुळे ऐन वेळेवर पेपर दीड तास विलंबाने सुरू झाल्याने परीक्षा केंद्रांवरील परीक्षार्थी उमेदवारांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण पसरून तारांबळ उडाली होती.
तलाठी पदाच्या परीक्षेत सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, सोमवारी परीक्षेची वेळ दीड तासाने वाढवून देण्यात आली.सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत परीक्षा घेण्यात आली. - विजय पाटील, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला