रेल्वेत ‘टीसी’ची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून युवकाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2016 01:37 AM2016-02-25T01:37:48+5:302016-02-25T01:37:48+5:30
चौघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल.
अकोला: पातूर येथील रहिवासी युवकास रेल्वेमध्ये टीसी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याची मुंबईतील तिघांसह अकोल्यातील एकाने तब्बल आठ ते दहा लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण बुधवारी रात्री उघडकीस आले. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी सदर चौघांविरुद्ध बुधवारी रात्री फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. पातूर येथील रहिवासी असलेला पवन दिनकर देवतळे हा शिकवणी वर्गासाठी अकोल्यातील गोकुळ कॉलनी येथे राहतो. येथे असताना त्याची ओळख मानधने प्लॉट येथील दत्ता रघुनाथ पदरे याच्याशी झाली. पदरे याने देवतळे याला रेल्वेत टीसी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याला मुंबई येथील रहिवासी मो. मकसुद वाहीद अली, मो. मकसुद मो. आलम व मो. तुफेर अहमद या तिघांची ओळख करून दिली. त्यानंतर या चौघांनी संगनमताने पवन देवतळे याला रेल्वेत टीसी पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखविले. त्याचे सर्व दस्तावेज घेऊन दोन ते तीन वेळा मुंबई वारी केली. परीक्षा घेतली. त्यानंतर प्रशिक्षण असल्याचेही सांगितले. बराच कालावधी उलटल्यावरही रेल्वेत नोकरी मिळत नसल्याने देवतळे याने दत्ता पदरे व सदर तिघांचा शोध सुरू केला. यामधील एकही आरोपी त्याला नंतर मिळाला नाही. अनेक महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देवतळे याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी दत्ता रघुनाथ पदरे, मो. मकसूद वाहीद अली, मो. मकसूद मो. आलम व मो. तुफेर अहमद या चौघांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ४६८ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.