दहा हजारांत तलाठीच झाले तहसीलदार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:14 AM2021-01-10T04:14:24+5:302021-01-10T04:14:24+5:30

तेल्हारा : तलाठ्याच्या हातून सात-बारामध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी नागरिक तलाठ्याकडे गेले, मात्र चूक दुरुस्तीकरिता तहसीलदारांचे आदेश लागतात, त्यामुळे ...

Tehsildar in tens of thousands? | दहा हजारांत तलाठीच झाले तहसीलदार?

दहा हजारांत तलाठीच झाले तहसीलदार?

googlenewsNext

तेल्हारा : तलाठ्याच्या हातून सात-बारामध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी नागरिक तलाठ्याकडे गेले, मात्र चूक दुरुस्तीकरिता तहसीलदारांचे आदेश लागतात, त्यामुळे आपण तहसीलदारांकडे प्रकरण दाखल करा, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु, दहा हजार रुपये दिल्यानंतर त्याच जनतेसाठी तलाठीच जणू तहसीलदार होऊन सात-बारामधील दुरुस्ती करीत असल्याचे समाेर आले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे

एका प्लॉटधारकाने प्लॉट खरेदी केल्यानंतर त्याची नोंद महसूल दप्तरी झाली. त्याचा सात-बाराही मिळाला. परंतु, संबंधित प्लॉटधारकाने खासगी कामाकरिता प्लॉटचा सात-बारा काढला असता त्याच्या नावासमोर कंस आला म्हणजे त्या प्लॉटधारकाने तो प्लॉट विकला, असे दर्शविते. त्यामुळे संबंधित चूक ही तलाठ्याकडूनच झालेली असताना तलाठ्यांनी प्लॉटधारकाला ही चूक दुरुस्त करण्यासाठी नियमाप्रमाणे आपण तहसीलदारांकडे अर्ज करून प्रकरण दाखल करा, त्यानंतर तहसीलदारांचे आदेश मिळाल्यानंतर सात-बारामधील चूक दुरुस्त केली जाईल, असे सांगितले. याकरिता वेळ लागेल, असे सांगून मोकळे झाल्यामुळे संबंधित प्लॉटधारकाची काहीही चूक नसताना नाहक हेलपाटे व होणारा विलंब बघता पुढील खासगी काम थांबल्याने हतबल झाले. परंतु तेच काम एका खासगी माणसामार्फत तलाठ्याकडे दिले असता १० हजार रुपयांमध्ये चूक दुरुस्तीचा सौदा झाला असता, त्या प्लॉटधारकाकरिता तलाठीच जणू तहसीलदार झाले. त्यांनीच काय होत्याचे नव्हते केले. प्लॉटधारकाला ना तहसीलदार, ना इतर कोठेही जाण्याची गरज पडली नाही व सात-बारामधील चूक दुरुस्त झाली, मात्र काहीही कारण नसताना प्लॉटधारकाला आर्थिक भुर्दंड का? या तलाठ्याने चूक दुरुस्ती व नोंदीकरिता १० हजार व ३० हजार रुपये असे फिक्स रेट ठरवून दिल्याची चर्चा आहे. अनेकांना रक्कम ऐकून तर धक्केच बसत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत जनजागृती करून जनतेकडून होणारी लूट थांबवावी, अशी जनतेमधून मागणी होत आहे. या प्रकरणात प्लॉटधारक तक्रार करणार असल्याची माहिती आहे.

........................

ऑनलाइन केली जाते दुरुस्ती

याबाबत तहसीलदारांकडून सदर प्रकरण कसे हाताळले जाते, याची माहिती घेतली असता तलाठी हे सात-बारामधील चूक दुरुस्ती ही १५५ खाली आमच्याकडे ऑनलाइन पाठवतात. आम्ही ऑनलाइन थंब मारून देतो व चूक दुरुस्ती होऊन जाते. याबाबत जनतेला माहिती नसल्यामुळे नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Web Title: Tehsildar in tens of thousands?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.