भारत राखीव बटालियनसाठी तेल्हारा-अकोटवासी आक्रमक; पालकमंत्र्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:30 PM2019-08-11T12:30:28+5:302019-08-11T12:31:56+5:30
अकोट व तेल्हारा तालुक्यातील बटालियन कॅम्प बचाव कृती समितीसह नागरिकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी केली.
अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात तळेगाव वडनेर व मनात्री येथे मंजूर असलेला भारत राखीव बटालियन क्र .५ अकोला तेल्हारा तालुक्यातच कायम ठेवण्याच्या मागणीसाठी अकोट व तेल्हारा तालुक्यातील बटालियन कॅम्प बचाव कृती समितीसह नागरिकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी केली.
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर व मनात्री येथील २०० एकर जमिनीवर भारत राखीव बटालियन क्र .५ च्या निर्मितीसाठी यापूर्वीच मंजुरी मिळाली असताना, अकोला तालुक्यातील शिसा उदेगाव व हिंगणा शिवार येथे भारत बटालियन क्र .५ ची निर्मिती करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गत ७ आॅगस्ट रोजी मान्यता देण्यात आली. त्यानुसार तेल्हारा तालुक्यात होणारा भारत राखीव बटालियन कॅम्प क्र .५ हलविण्यात आल्याने तालुक्यातील विकास थांबणार असून, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उपलब्ध होणारा रोजगार थांबणार आहे. तसेच यापूर्वी मंजुरी मिळालेल्या तेल्हारा तालुक्यातील भारत राखीव बटालियन कम्प दुसरीकडे हलविण्यात आल्याने, अकोट विधानसभा मतदारसंघातील जनतेवर अन्याय झाला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या मंजुरीनुसार भारत राखीव बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यातच कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी करीत बटालियन करीत, बटालियन कॅम्प बचाव कृती समितीसह अकोट व तेल्हारा तालुक्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी कृती समितीच्या सदस्यांनी संबंधित मुद्यावर चर्चा करून मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्यासह बटालियन कॅम्प बचाओ कृती समितीचे रमेश ताथोड, देवानंद नागले, गजानन थोरात, किरण अवताडे, अनुप मार्के, विवेक खारोडे, दिलीप बोचे, प्रदीप वानखडे, संजय आठवले, चंदू दुबे, सारंग कराळे, गणेश दुबे, विजय शिंदे, सागर राऊत, विजय माटोडे, डॉ. संजीवनी बिहाडे, अॅड. महेश गणगणे, अजय गावंडे, गोवर्धन डाबेराव, अनंता मनतकार, रामभाऊ फाटकर, अनंत अहेरकर, चद्रकांत मोरे, राजेश काटे, नरेंद्र गावंडे, रामकृष्ण मनतकार, विनीत हिंगणकर, ज्ञानेश्वर गव्हाळे, प्रा. संजय बोडखे, प्रकाश वाकोडे, संदीप वसतकार यांच्यासह इतर अकोट व तेल्हारा तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; पालकमंत्र्यांचे आश्वासन!
भारत राखीव बटालियन तेल्हारा तालुक्यात कायम ठेवण्याच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवार, १३ आॅगस्ट रोजी मुंबई येथील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बटालियन बचाओ कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर भावना मांडून मागणीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बटालियन कॅम्प बचाओ कृती समितीला दिले. या विषयाचे राजकारण करायचे नसून, अकोट व तेल्हारा तालुक्यातील रस्ते कामांसाठी अधिक निधी देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे बैठकीत करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
अकोट-तेल्हारा बंदचे आवाहन स्थगित!
भारत राखीव बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यात कायम ठेवण्याच्या मागणीसाठी बटालियन कॅम्प बचाओ कृती समितीच्यावतीने मंगळवार, १३ आॅगस्ट रोजी अकोट-तेल्हारा बंदचे आवाहन करण्यात आले होते; मात्र या मुद्यावर १३ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. त्यामुळे अकोट-तेल्हारा बंदचे आवाहन स्थगित करण्यात आल्याचे कृती समितीच्यावतीने यावेळी जाहीर करण्यात आले.