तेल्हारा तालुका : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दापुर्यात रास्ता रोको; अनेकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 07:47 PM2018-01-02T19:47:38+5:302018-01-02T20:58:23+5:30
तेल्हारा : भीमा कोरेगाव येथील जाळपोळ, दगडफेक व लुटमार करणार्यांना त्वरित अटक करून गुन्हे दाखल करण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील बौद्ध बांधव व संघटनांनी शांततेत मोर्चा, निवेदन, रास्ता रोको करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : भीमा कोरेगाव येथील जाळपोळ, दगडफेक व लुटमार करणार्यांना त्वरित अटक करून गुन्हे दाखल करण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील बौद्ध बांधव व संघटनांनी शांततेत मोर्चा, निवेदन, रास्ता रोको करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
तालुक्यातील दापुरा येथील ४0 ते ५0 नागरिकांनी ठाणेदार तेल्हारा यांना निवेदन देऊन भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दापुरा फाट्यावर काही वेळ रास्ता रोको केला. त्यामुळे अकोट-शेगाव मार्गावरील वाहतूक बंद होती. दरम्यान, तेल्हारा पोलिसांनी दापुरा येथील कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून स्थानबद्ध केले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून मोठय़ा प्रमाणात निवेदन देण्यासाठी बौद्ध बांधव एकत्र झाले. त्यांचे मोर्चात रूपांतर झाले. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनानंतर मोर्चा तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये आला. यावेळी त्यांनी नव्याने रुजू झालेले एसडीपीओ इंगळे यांना निवेदन दिले. यावेळी प्रवीण पोहरकार, अशोक दारोकार, भारत पोहरकार, विकास पवार, रवींद्र खर्चे यांनी ३ जानेवारीला तेल्हारा शहरात सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत शहर बंदचे निवेदन दिले. घटनेच्या निषेधार्थ तेल्हारा तालुका भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, जीवन बोदडे, अशोक दारोकार, संदीप कांबळे, गोवर्धन पोहरकार, भगवान हागे, नाजुक दारोकार, संजय हिवराळे, प्रताप गव्हांदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.