अवैध रेती प्रकरणात तेल्हारा तहसीलदारांनी ठोठावला ४२ लाखांचा दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:34 AM2021-03-04T04:34:37+5:302021-03-04T04:34:37+5:30
तेल्हारा : महसूल विभागाने अवैध रेती प्रकरणात गेल्या अकरा महिन्यांत ४८ कारवाया केल्या असून, ४२ लाख दंड केला, ...
तेल्हारा : महसूल विभागाने अवैध रेती प्रकरणात गेल्या अकरा महिन्यांत ४८ कारवाया केल्या असून, ४२ लाख दंड केला, तर ८ वाहने पोलीस स्टेशनमध्ये जमा असून, ८ प्रकरणांत दंडात्मक कारवाई सुरू आहे. दोन वाहने पसार झाल्याने त्याबाबत पोलीस स्टेशनला पत्र दिले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तिप्पट कारवाया करण्यात आल्या असून, तिपटीने दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवायांमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहे.
रेतीची अवैध वाहतूक करणारे वाहनधारक शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीत लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. महसूल विभाग कारवाई करून गौण खनिज चोरीला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करीत आहे. तालुक्यात बरेच नदी-नाले असून, पूर्णा व वाण नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन होत असून, अनेक रेतीमाफिया निनावी नंबरच्या वाहनाने अवैध वाहतूक करतात. सदर वाहनेही महसूल विभागाच्या कारवाईनंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पाठवणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या काही महिन्यांपर्यंत अशा कारवाया करण्यात आल्या नाहीत, तसेच दंड वसूल होणे गरजेचे होते; परंतु तसे झाले नाही. त्यामुळेसुद्धा महसूल विभागाच्या वसुलीमध्ये बरीच घट झाली होती. मागील वर्षात २०१९-२० मध्ये केवळ अकरा वाहनांवर कारवाई करून केवळ १५ लाख महसूल शासनाकडे जमा झाला, तर चालू वर्षात सण २०२०-२०२१ च्या अकरा महिन्यांत ४८ कारवाया करण्यात आल्या असून, ४२ लाखांवर दंड ठोठाविण्यात आला असून, २८ लाख रुपयांचा महसूल शासन दप्तरी जमा झाला आहे. यामध्ये गेल्या तीन महिन्यांत नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार राजेश गुरव यांच्याकडे संजय गांधी निराधार योजना हा विभाग असताना त्यांच्याकडे तहसीलदारपदाचा प्रभार आला. चालू वर्षातील मागील तीन महिन्यांत अवैध रेती वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांनी २८ प्रकरणांत कारवाई करून २६ लाख रुपये दंड वसूल केला आहे. सोबत निनावी नंबरची वाहनांकडून दंडात्मक वसुली करून ती वाहने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला यांच्याकडे वर्ग केली आहेत, तसेच ११२ ब्रास रेती जप्त करून तिचा जाहीर लिलाव ठेवला आहे. ज्या ठिकाणावरून रेती जप्त केली त्यांच्या सातबारावरसुद्धा दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे, असे तहसीलदार राजेश गुरव यांनी सांगितले. सदर कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहे.