अकाेला जिल्ह्यात प्रथमच आढळला पाणलावा व पांढऱ्या शेपटीची टिटवी
By Atul.jaiswal | Published: December 19, 2023 01:22 PM2023-12-19T13:22:15+5:302023-12-19T13:23:09+5:30
आखतवाडा व कापशी तलावावर झाले दर्शन : पक्षीमित्रांनी टिपले कॅमेऱ्यात
अकोला : हिवाळा सुरु झाला की जिल्ह्यातील पाणवठ्यांवर देश-विदेशातील पक्ष्यांचे आगमण होते. विविध प्रकारच्या पक्ष्यांचे थवे पाणवठ्यांवर हमखास दिसून येतात. यावर्षी अर्धा डिसेंबर उलटून गेल्यानंतरही परदेशी पाहुण्या पक्ष्यांची प्रतीक्षाच असली तरी कापशी तलाव परिसरात पांढऱ्या शेपटीची टिटवी (White-Tailed Lapwing) आणि आखातवाडा तलावावर 'टेम्मिंकचा पाणलावा(Temminck's Stint) या दोन नवीन पक्ष्यांचे दर्शन झाले.
या पक्ष्यांची अकोला जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद असल्याचा दावा पक्षीमित्रांनी केला आहे. हिवाळ्यात आपल्याकडे एकुण १५९ प्रजातींचे स्थलांतरीत पक्षी पाहुणे म्हणुन येतात. यात पाणथळीच्या पक्ष्यांबरोबरच माळरानावरचे, शाखारोही आणि शिकारी पक्षीही येतात. पाणपक्ष्यांमध्ये विविध प्रकारची बदके, पाणथळीत पोटपुजा करणारे पक्षी(Waders) दाखल होतात. तसेच गप्पीदास, कस्तुर, शंकर, धोबी, क्रौच असे छोटे मोठे पक्षीही येतात. या सर्वांच्या मागावर असलेले दलदल ससाणा, शिक्रा, कवड्या हरिअर, श्येन, तीसा, कुकरी, खरुची असे शिकारी पक्षीही येतात.
डिसेंबरच्या सुरुवातीपासुन पक्षीमित्र पाहुण्या पक्षांच्या मागावर भटकतात, दिसतील त्या द्विजगणांना न्याहाळून,कॅमेऱ्यात टिपतात. शहरातील पक्षीमित्रांची एक चमु आखातवाडा,कुंभारी,कापशी पाणवठ्यांवर भटकत असताना त्यांना दोन नवे पाहुणे पक्षी प्रथमच आढळले. ते त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले. आपल्या परिसरात आतापर्यंत दोनच प्रकारच्या टिटव्या आढळायच्या पण जेष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी, हंसराज मराठे, डॉ. अतुल मुंदडा, देवेंद्र तेलकर यांना कापशी तलाव परिसरात पांढऱ्या शेपटीची टिटवी आणि आखातवाडा तलावावर 'टेम्मिंकचा पाणलावा आढळून आला.
परदेशी पाहुण्यांची प्रतिक्षाच
दरवर्षी डिसेंबरच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यातील पाणवठे व माळरान स्थलांतरीत पक्ष्यांनी गजबजून जातात. पंचक्रोशीतील पाणवठे, तलाव,धरण परिसरात पक्षीमित्रांच्या भेटी सुरु होतात. या वर्षी मात्र निम्मा डिसेंबर महिना उलटून गेला तरी अद्यापपर्यंत स्थलांतरीत पक्षांनी पाणवठ्यांवर हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पक्षीमित्र नाखुश आहेत.
पाणलावा व पांढऱ्या शेपटीची टिटवी व पाणलावा हे दोन पक्ष्यांचे प्रथमच दर्शन झाले. आनंदाची बाब म्हणजे ही अकोला जिल्ह्यातील पहिली नोंद आहे. पक्षीनिरीक्षणाचा छंद मानवाला मानसिकरित्या सशक्त तर करतोच शिवाय सतत नवे काहीतरी शोधायला उद्दुक्त करतो. म्हणुन पक्षीनिरिक्षणाचा छंद मानवाने जोपासणे आवश्यक आहे.- दीपक जोशी, ज्येष्ठ पक्षीमित्र, अकोला