नवतपामध्ये तापमानात घट
By admin | Published: June 5, 2015 11:47 PM2015-06-05T23:47:02+5:302015-06-05T23:47:02+5:30
निसर्गचक्र बिघडले, नक्षत्रांशी जुळेना मेळ.
अकोला : हवामान खात्याच्या निर्मितीपूर्वी नक्षत्र व पंचागांनुसारच देशभरात पाऊस व उन्हाचा अंदाज लावला जात होता. बहुधा ठरलेल्या वेळी पावसाळा व उन्हाळ्याला सुरुवात व्हायची. लोकांचा नक्षत्रांवर दृढ विश्वास होता. आता मात्र वाढते तापमान व प्रदूषणामुळे निगर्सचक्र विस्कळीत झाले आहे. त्यामुळे निसर्ग व पंचागाचा ताळमेळही बिघडला आहे. यावर्षी २५ मेपासून सुरू झालेल्या नवतपामध्ये तापमानात वाढ होण्याऐवजी घट नोंदविण्यात आली आहे. उन्हाळ्यातील सर्वांत जास्त तापमानाचे दिवस म्हणजे नवतपा, असा सर्वसाधारण समज आहे. यावर्षी २५ मे पासून नवतपा सुरू झाला. तथापि, या नऊ दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याऐवजी घटच झाली. मे महिन्यात अखेरच्या पंधरवड्यात तापमानात वाढ झाली. १८ ते २४ मे दरम्यान अकोल्यात ४६ डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली. २५ मे पासून नवतपा सुरू झाल्यामुळे तापमान आणखी वाढेल, असा अंदाज होता; मात्र २५ ते ३0 मे दरम्यान तापमानात घट होत अकोल्यात ४२ ते ४३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. १ जूनपासून तर त्यामध्ये आणखी घट झाली. मे महिन्यात प्रचंड तापमानामुळे नागरिकांनी घरातच बसणे पसंत केले होते. बाजारपेठेमध्येही गर्दी नव्हती. ७ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात होते. त्यामुळे बहुतांश वेळा ७ जूनला पाऊस येत होता. गत चार ते पाच वर्षांपासून मात्र पावसाळ्याला २५ जूननंतरच सुरुवात होते. त्यामुळे आता शेतकरीही नक्षत्रांवर विसंबून न राहता हवामान खात्याच्या अंदाजानुसारच नियोजन करतात.