मंदिर प्रवेश प्रयोग; आंबेडकरांचा दुसरा अंक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:11 PM2020-08-31T23:11:11+5:302020-08-31T23:15:02+5:30
अॅड. आंबेडकरांनी या माध्यमातून आम्ही हिंदू विरोधी नाहीत, हे संकेत देत वंचितच्या राजकारणाला आणखी व्यापक करण्यासाठी टाकलेले हे पाऊल असल्याचे मानले जाते.
- राजेश शेगोकार
अकोला : अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वराच्या कावड यात्रेच्या निमित्ताने मंदिर खुले करून यात्रेची परंपरा कायम ठेवा या मागणीकरिता अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी १५ दिवसांपूर्वी थेट मंदिरात प्रवेश करून हिंदुत्ववादी मतांचे राजकारण करणाऱ्यांना धक्का दिला होता. याच मंदिर प्रवेशाचा दुसरा अंक सोमवारी पंढरपुरात पार पडला. २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलेले राजराजेश्वराचे मंदिर ज्याप्रमाणे अॅड. आंबेडकरांसाठी खुले झाले तोच कित्ता पंढरपुरात घडला. अॅड. आंबेडकरांनी या माध्यमातून आम्ही हिंदू विरोधी नाहीत, हे संकेत देत वंचितच्या राजकारणाला आणखी व्यापक करण्यासाठी टाकलेले हे पाऊल असल्याचे मानले जाते.
सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करणाºया अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. गेल्या निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने दलितेतर मतांकडे लक्ष केंद्रित केले. लोकसभा निवडणुकीत राज्यात ४२ लाख तसेच विधानसभा निवडणुकीत २९ लाख मते घेऊन त्यांच्या पक्षाने राज्यातील अनेक मतदारसंघातील समीकरणे बदलविली. आता लॉकडाऊनच्या निमित्ताने त्यांनी नव्या संधीचा शोध घेतला. ज्या मुद्यांवर लोकांमध्ये रोष आहे, त्या मुद्यांना हात घातला. एसटीसाठी डफली वाजवली, हातावर पोट असलेल्या बारा-बलुतेदारांसाठी आंदोलनाची हाक दिली. या सर्व आंदोलनात मास्टरस्ट्रोक ठरले मंदिर प्रवेशाचे आंदोलन. त्यांच्या राजकीय कर्मभूमीतील राजराजेश्वराच्या कावड यात्रेला ७६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा. प्रशासनाने कोरोनाचे कारण देत यात्रेला परवानगी नाकारली होती. या मुद्यावर त्यांनी थेट मंदिर उघडून दर्शन घेत लक्ष वेधले होते.
अॅड. आंबेडकरांसाठी बंद असलेले मंदिर उघडू शकते हे लक्षात आल्यावर पंढरपूरचे मंदिर खुले करण्यासाठी चळवळ उभारणाºया सर्व वारकऱ्यांना हुरूप आला आणि मंदिर प्रवेश आंदोलनाला व्यापकता आली. यामध्ये थेट आंबेडकरांनी उडी घेतल्याने या आंदोलनाचे राजकीयकरण झालेच. ज्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अॅड. आंबेडकरांनी निवडणूक लढविली त्याचा पंढरपुरातील मंदिराचा प्रश्न असल्याने साहजिकच त्यांची नैतिक जबाबदारीही होतीच; मात्र या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे राजकारण अधिक व्यापक करण्याची संधी त्यांनी साधली आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणून पक्षाची प्रतिमा उंचावण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे. योगायोग म्हणजे एसटी सुरू करण्यासाठी आंबेडकरांनी डफली वाजवली व एसटी सुरू करण्याचा निर्णय झाला. नाभिक समाजाला दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी यासाठी त्यांनी आंदोलनाची हाक दिली अन् अटी, शर्तीवर त्यांना परवानगी मिळाली. आता पंढरपुरातील आंदोलनानंतर थेट मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करून आठ दिवसात निर्णय होण्याचे आश्वासन मिळाल्याने अॅड. आंबेडरकरांना महाआघाडी शासन भाजपपेक्षाही अधिक गांभीर्याने घेते हे सुद्धा अधोरेखित झाले आहे.