मंदिरे बंद; श्री राजेश्वराच्या जलाभिषेकासाठी अशीही क्लुप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:41 AM2021-09-02T04:41:39+5:302021-09-02T04:41:39+5:30
श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून निरंतर ...
श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून निरंतर सुरु आहे. या महिन्यातील शेवटच्या साेमवारी माेठ्या उत्साहात कावड व पालखी उत्सव साजरा केला जाताे. हा अभूतपूर्व उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातील शिवभक्त शहरात दाखल हाेतात. परंतु काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही कावड,पालखी साेहळा रद्द करण्यात आल्याने शिवभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. दरम्यान, मंदिरे बंद असल्याने भाविकांना मंदिराच्या प्रवेशद्वारावर नतमस्तक हाेऊन परतावे लागत आहे. श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करता यावा,यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी काही शिवभक्तांसह कावड व पालखी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमधून उमटू लागली हाेती. या भावनेची दखल घेत मंदिर व्यवस्थापनाने प्रवेशद्वारावर गंगाळ व पाइपच्या माध्यमातून थेट आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
थेट पिंडीवर जलाभिषेक
श्रावण महिन्यातील पहिल्या साेमवारपासूनच कावडधारी शिवभक्तांनी जलाभिषेकाची परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशातून दाेन किंवा चार भरण्यातून श्री राजराजेश्वराला जलाभिषेक सुरु ठेवला हाेता. परंतु मंदिर बंद असल्याने जलाभिषेक करता येत नसल्याने शिवभक्तांमध्ये नाराजीचा सूर हाेता. ही बाब लक्षात घेत श्री राजराजेश्वर मंदिर व्यवस्थापनाने थेट प्रवेशद्वारावरच जलाभिषेकाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
यंदाही मानाच्या पालखीलाच परवानगी
काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीत कावड व पालखी उत्सवाला परवानगी देण्याची विनंती श्री राजराजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली हाेती. परंतु गतवर्षीप्रमाणे यंदाही मानाच्या श्री राजराजेश्वराच्या पालखीलाच परवानगी देण्यात आली आहे.