१३४ अस्थायी पदांना तात्पुरता दिलासा!
By admin | Published: March 23, 2017 02:16 AM2017-03-23T02:16:06+5:302017-03-23T02:16:06+5:30
१३४ वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, आता ते ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंंत सेवा देणार आहेत.
वाशिम, दि. २२- अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणार्या पाच जिल्ह्यांतील ग्रामीण रुग्णालयांत अस्थायी सेवा देणार्या १३४ वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, आता ते ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंंत सेवा देणार आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब रुग्णांना मोफत व अत्यल्प दरात वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयांची निर्मिती केली आहे. अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत वाशिम, अकोला, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील आरोग्यविषयक कारभार पाहिला जातो. या पाच जिल्ह्यांत एकूण ४६ ग्रामीण रुग्णालय असून, येथे मोठय़ा संख्येने वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची पदे मंजूर आहेत. काही पदे रिक्त असल्याने रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात व्यत्यय निर्माण होतो. या पृष्ठभूमीवर शासनाने तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार ४६ ग्रामीण रुग्णालयांत तात्पुरत्या स्वरूपात १३४ वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची अस्थायी सेवा घेतली जात आहे.
४६ ग्रामीण रुग्णालयातील या १३४ अस्थायी पदांची मुदत २८ फेब्रुवारी २0१७ पर्यंंत होती. मुदतवाढ नसल्याने अस्थायी पदांवर सेवा देणार्या अधिकारी-कर्मचार्यांपुढे पेच निर्माण झाला होता. या अस्थायी पदांची सेवा आणखी वाढविण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला होता. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २१ मार्च रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली असून, सर्व अस्थायी पदांना ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात का होईना १३४ अस्थायी अधिकारी व कर्मचार्यांना दिलासा मिळाला. ग्रामीण रुग्णालयांतील १३४ अस्थायी पदांना शासनाने मुदतवाढ दिल्याच्या वृत्ताला अकोला मंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दुजोरा दिला आहे.