मराठीच्या पेपरलाच दहा कॉपीबहाद्दर निलंबित
By admin | Published: March 2, 2016 02:50 AM2016-03-02T02:50:50+5:302016-03-02T02:50:50+5:30
दहावीची परीक्षेदरम्यान शिक्षण विभागाच्या पथकांची अकोल्यात कारवाई.
अकोला: इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. मराठी विषयाचा मंगळवारी पहिला पेपर होता. पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाच्या तीन पथकांनी परीक्षा केंद्रांवर धाडी टाकून दहा कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना निलंबित केले.
जिल्ह्यातील ११६ परीक्षा केंद्रांवर मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. एकूण ३१ हजार ५८४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. मराठी विषयाचा पेपर असल्याने परीक्षेला शांततेत सुरुवात होईल. अशी अपेक्षा होती; परंतु पहिल्याच दिवशी कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई झाली. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या पथकाने पातूर तालुक्यातील चरणगाव येथील चेतना विद्यालय परीक्षा केंद्रावर अचानक धाड घातली. या परीक्षा केंद्रावर तीन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पथकाने रंगेहात पकडले. त्यांना निलंबित करण्यात आले. दुसरी कारवाई शिक्षणाधिकारी (माध्यमिक)प्रकाश मुकुंद यांच्या पथकाने केली. आळंदा येथील जय बजरंग विद्यालय परीक्षा केंद्रावर तीन कॉपीबहाद्दरांना कॉपी करताना पकडले. विशेष म्हणजे, जय बजरंग विद्यालय परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी धाड घालून कॉपी करताना काही विद्यार्थ्यांना पकडले होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या पथकाने बाश्रीटाकळी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालय परीक्षा केंद्रावर धाड घालून दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले व निलंबित केले. परांडा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय परीक्षा केंद्रावरही कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी पथकाने दोन विद्यार्थ्यांना निलंबित केले. ही कारवाई शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर, शिक्षण विस्तार अधिकारी स्मिता परोपटे, आत्माराम राठोड यांनी केली.