बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी आणखी दहा दिवसांची मुदतवाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 02:31 PM2018-10-21T14:31:44+5:302018-10-21T14:31:59+5:30
अविनाश बोर्डे यांनी राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
अकोला: फेब्रुवारी-मार्च २0१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेचे आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी २१ आॅक्टोबर ही मुदत दिलेली होती; परंतु सरल डाटाबेस संकेतस्थळ संथ झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरावा लागणार होता. त्यामुळे विदर्भ ज्युनिअर टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य मंडळाने ३0 आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २0१९ मध्ये इयत्ता बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेस संकेतस्थळावरून भरण्यासाठी १ ते २१ आॅक्टोबरपर्यंत कालावधी दिला होता; परंतु सरल डाटाबेसवर विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना, विद्यार्थ्यांना बराच वेळपर्यंत वाट पाहावी लागत होती. सरल डाटाबेस संथ झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना अडचणी येत होत्या. याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसणार होता. २१ आॅक्टोबर ही मुदत निघून गेल्यानंतर विद्यार्थ्यांना २५ रुपये विलंब शुल्कासह अर्ज भरावा लागणार होता. सरल डाटाबेस संकेतस्थळ संथ झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील प्राध्यापकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेता ‘विजुक्टा’चे प्रांताध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी शनिवारी राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांच्यासोबत संपर्क साधला आणि त्यांना विद्यार्थ्यांच्या अडचणींची जाणीव करून दिली. सरल डाटाबेस संकेतस्थळ संथ झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांना परीक्षेचे अर्ज भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी केली. विजुक्टाच्या पाठपुराव्यामुळे राज्य मंडळाने २२ ते ३0 आॅक्टोबरपर्यंत सरल डाटाबेसवरून आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे, तसेच उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना १२ ते १७ नोव्हेंबरपर्यंत बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)