म्युकरमायकोसिसचे दहा रूग्ण बरे, सहा रूग्णांवरउपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 05:45 PM2021-05-19T17:45:44+5:302021-05-19T17:48:43+5:30
Mucormycosis in Akola : जिल्हयात या आजाराचे १६ रूग्ण हाेते त्यापैकी दहा रूग्ण बरे झाले असून उर्वरित सहा रूग्णांवर उपचार सुरू आहेत
अकोला: कोरोनासोबतच जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने पायमुळं पसरविण्यास सुरुवात केली आहे. म्युकरमाकोसिसचा संभाव्य धोका टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या सुचनेमुसार सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजन यंत्रणेतील फ्लो मीटरच्या बॉटलमधील पाणी नियमीत बदलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रुग्णालयाकडून ही खबरदारी घेतली जात असली, तरी रुग्णांनी नाक, तोंड आणि कानाची नियमीत स्वच्छता राखावी, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जात आहे. दरम्यान जिल्हयात या आजाराचे १६ रूग्ण हाेते त्यापैकी दहा रूग्ण बरे झाले असून उर्वरित सहा रूग्णांवर उपचार सुरू आहेत
कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे. विशेषत: ऑक्सिजनवरील रुग्णांना नियमीत ऑक्सिजन मास्क लावावा लागतो. त्याची नियमीत स्वच्छता होत नसल्याने काळी बुरशी तयार होण्याची शक्यता नाकराता येत नाही. यासाेबतच ऑक्सिजन यंत्रणेतील फ्लो मीटरच्या बॉटलमधील पाणी नियमीत बदलणे गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नीत सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजन यंत्रणेतील हे पाणी नियमीत बदलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. म्युकरमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी जीएमसी प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याच सोबत कोविडच्या रुग्णांनीही विशेष खबरदारी घेत नाक, तोंड आणि कानाची नियमीत स्वच्छता राखावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.
रुग्णांनी काय काळजी घ्यावी
रुग्णांसह सर्वसामान्यांनी नियमीत नाकपुड्या स्वच्छ ठेवाव्यात.
नाकातील त्वचा कोरडी व्हायला नको.
टाळूवर काही चिटकून राहायला नको.
तोंड स्वच्छ ठेवावे.
डोळे कोरडे पडू देऊ नका.
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत.संभाव्य धोका लक्षात घेता, सर्वोपचार रुग्णालयातर्फे विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोविडरुग्णांसह सर्वसामान्यांनी म्युकरमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी नाक, कान आणि घसा, दात स्वच्छ ठेवावे.
- डॉ. दिनेश नैताम, वैद्यकीय उपअधीक्षक, जीएमसी, अकोला