आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 06:23 PM2019-03-15T18:23:03+5:302019-03-15T18:23:12+5:30
अकोला : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये मोडणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
अकोला : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये मोडणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणाची अंमलबजावणी नवीन शैक्षणिक सत्रापासून होणार असून,राज्यभरातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय शैक्षणिक संस्था, अनुदानित विद्यालये, महाविद्यालयांमध्ये एकूण प्रवेशाच्या दहा टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय शासनाने १२ फेब्रुवारी रोजी घेतला होता; परंतु यामध्ये आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाला वगळण्यात आले होते. त्यामुळे आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले होते. अखेर शासनाने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाºया घटकांसाठी आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या नवीन शैक्षणिक सत्रापासून या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी हा लाभ उपभोगता येईल. राज्यातील आरोग्य विज्ञानाच्या शासन अनुदानित तसेच खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये एकूण प्रवेशाच्या दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी दहा टक्के आरक्षण मिळाल्याने या विद्यार्थ्यांनादेखील संधी मिळेल.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.