भूसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसच्या दहा फेऱ्या रद्द
By Atul.jaiswal | Published: September 10, 2023 07:02 PM2023-09-10T19:02:55+5:302023-09-10T19:04:38+5:30
अकोला स्थानकावरून जाणाऱ्या गोंडावाना एक्स्प्रेसच्या दहा फेऱ्या १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधित धावणार नसल्याने अकोलेकरांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
अकोला : मध्य रेल्वेच्या झांसी जंक्शन रेल्वेस्थानकावर फलाट क्र. ४ च्या दुरुस्तीच्या कामासाठी पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्याने उत्तर भारतात जाणाऱ्या सहा एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अकोला स्थानकावरून जाणाऱ्या गोंडावाना एक्स्प्रेसच्या दहा फेऱ्या १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधित धावणार नसल्याने अकोलेकरांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ कार्यालयाकडून प्राप्त माहितीनूसार, दर शुक्रवार आणि रविवारी प्रवास सुरु होणारी १२४०६ हजरत निजामुद्दीन - भुसावळ जंक्शन गोंडवाना एक्सप्रेस १५, १७, २२, २४ व २९ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच दर मंगळवार व रविवार प्रवास सुरु होणारी १२४०५ भुसावळ जं.-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस १७, १९, २४, २६ सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. पायाभूत सुविधेच्या कामासाठी गोंडवाना एक्स्प्रेसच्या अप व डाऊन अशा दहा फेऱ्या रद्द करण्यात आल्याने दिल्लीला जाण्याचे नियोजन करून ठेवलेल्या अकाेलेकरांसह इतर स्थानकांवरील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.