पिकांसाठी खत वापराची दशसूत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 10:48 AM2021-06-09T10:48:52+5:302021-06-09T10:49:32+5:30
Ten rules of Fertilizer Use for Crops : प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
अकोला : राज्यात पिकांसाठी खत वापराची दहा सूत्रे (दशसूत्री) कृषी विभागामार्फत निश्चित करण्यात आली असून, या दशसूत्रीनुसार खतांचा वापर करुन , अतिरिक्त खतांचा वापर टाळण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
पिकांसाठी रासायनिक खतांचा अतरिक्त वापर केल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो. तसेच रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचे आरोग्य खालावते. या पार्श्वभूमीवर पिकांसाठी एकात्मिक खत व्यवस्थापनाची दहा सूत्रे कृषी आयुक्तालयामार्फत ठरविण्यात आली आहेत. त्यानुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या दशसूत्रीनुसार पिकांसाठी खतांचा शेतकऱ्यांनी वापर करावा, पिकांसाठी अतिरिक्त खतांचा वापर टाळावा, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. पिकांसाठी रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळल्यास शेतकऱ्यांच्या खतखरेदीच्या खर्चातही बचत होणार आहे.
पिकांसाठी एकात्मिक खत व्यवस्थापनाची अशी आहेत सूत्रे !
जमीन आरोग्य पत्रिकाप्रमाणे पिकांसाठी खताचे व्यवस्थापन करणे, रासायनिक खतासोबतच सेंद्रीय खते आणि जैविक खतांचा वापर करणे, नत्रयुक्त खताची मात्रा विभागून देणे, खते व बियाणे एकाचवेळी दोन चाळ्यांच्या पाभरीने पेरणे, विद्राव्य स्वरूपातील खते ठिब संचातून देणे, जीवाणू खतांचा वापर करुन रासायनिक खतांची २० ते २५ टक्केपर्यंत बचत करणे, सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत हिरवळीचे खत, पेंडीचा वापर करणे, रासायनिक खते ब्रिकेटच्या स्वरूपात वापरणे, रासायनिक खते काही फवारणीद्वारे देणे आणि माती परीक्षण अहवालानुसार सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खतांचा वापर शेणखतातून किंवा फवारणीद्वारे करणे.
पिकांसाठी खतांच्या वापरासंदर्भात दहा सूत्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी खतांचा वापर करावा, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करू नये, सेंद्रिय खतांचा वापर करावा, यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
- कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला