दहा वर्षीय बालक मृतावस्थेत आढळला
By admin | Published: August 14, 2015 12:43 AM2015-08-14T00:43:44+5:302015-08-14T00:43:44+5:30
मलकापूर येथील घटना; खुनाचा संशय, गुन्हा दाखल.
मलकापूर(जि. बुलडाणा) : दहा वर्षीय बालक येथील इदगाह मैदानाजवळील शेतात मृतावस्थेत आढळून आला. ही घटना १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी येथे घडली. शहरातील पारपेठ भागातील मुस्ताक अलीनगर भागात राहणारा कैफखान कलीमखान हा १0 वर्षीय बालक पारपेठ भागातील इदगाह मैदानावर असलेल्या सिद्दीक सुपडू यांच्या शेतातील नाल्याजवळ गंभीर अवस्थेत आढळून आला. सदर प्रकार निदर्शनास येताच त्याला हुसेनखां उस्मानखां व आसिफशाह बिसमिल्लाशाह या दोघांनी दुचाकीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. यावेळी हजर असलेल्या डॉक्टरांनी कैफखान याची तपासणी केली आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे कैफखान याला घरी नेण्यात आले. घरी पोहोचल्यानंतर तो जिवंत असल्याचे नातेवाइकांना वाटल्याने त्याला पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकार्याने त्याला खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला; मात्र त्यास खासगी रुग्णालयात नेले असता, कैफखान हा मृत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, याप्रकरणी मृतकाच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत आरोपी शेख अनिस शेख मजिद (३७) याने कैफखान यास तिच्या घराजवळील नाल्याजवळ लाथ मारून पाडले व रूमालाने गळा दाबुन मारल्याचा आरोप केला. यावरून पोलीसांनी आरोपीस रात्री उशिरा अटक केली. * नातेवाइकांची रुग्णालयावर तुरळक दगडफेक व पोलीस ठाण्यात ठिय्या कैफखान यास उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी हयगय केल्याचा आरोप करून त्याच्या नातेवाइकांनी गोंधळ घातला तसेच तुरळक दगडफेक केली. यामुळे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. यानंतर तणावाचे वातावरण निवळले. त्यानंतर पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.