मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्यास दहा वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2017 12:31 AM2017-04-21T00:31:04+5:302017-04-21T00:31:04+5:30
अकोला : घराशेजारी राहणाऱ्या बारा वर्षीय मुलाच्या घरात घुसून बळजबरीने त्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने युवकास दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
चार वर्षांपूर्वी केले होते लैंगिक शोषण
अकोला : घराशेजारी राहणाऱ्या बारा वर्षीय मुलाच्या घरात घुसून बळजबरीने त्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अ.ज. ख्वाजा यांच्या न्यायालयाने युवकास दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
जुने शहरातील एका भागात राहणारा बारा वर्षीय मुलगा वसतिगृहात राहतो. तो २८ एप्रिल २०१३ रोजी घरी आला. काकांच्या घरी गेल्यानंतर तो त्याच्या घरी परतला. घराशेजारी राहणारा आरोपी सागर दीनानाथ जाधव (२३) हा सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याच्या घरी आला. सागरने त्याला चांगले घर बांधले, जेवण केले का, असे विचारले आणि घरात कोणीही नसल्याचे पाहून मधल्या खोलीतील दरवाजा बंद केला. मुलाला जवळ ओढून त्याने त्याच्या अंगावरील कपडे काढले. यावेळी मुलाने त्याला विरोध केला; परंतु विरोधाला न जुमानता सागर जाधव याने त्याचे लैंगिक शोषण केले आणि कार्यभाग उरकून तो निघून गेला.
ही बाब मुलाने त्याच्या काकांना सांगितली. त्यानंतर दोघांनीही जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी भादंवि कलम ४५२, ३७७ पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पीएसआय सतीश फरकाडे यांनी केला. त्यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अ.ज. ख्वाजा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाने आठ साक्षीदार तपासले. आरोपी व पीडित मुलाचा वैद्यकीय अहवालामध्ये लैंगिक शोषण झाल्याचे नमूद असल्याने, न्यायालयाने साक्षी व पुरावे ग्राह्य मानून आरोपी सागर देशमुख याला पॉस्कोमध्ये दहा वर्षे कारावास, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास सहा महिने कारावास, कलम ४५२ मध्ये दोन वर्षे कारावास, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास सहा महिने कारावास आणि कलम ३७७ मध्ये सात वर्षे कारावास, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. या तीनही शिक्षा एकावेळेस आरोपीला भोगाव्या लागणार आहेत. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ श्याम खोटरे यांनी बाजू मांडली.
आरोपी म्हणे, तो मी नव्हेच !
न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपी सागर जाधव याने तो मी नव्हेच, अशी भूमिका घेतली आणि घटनेच्या दिवशी आपण सत्संगाला गेलो होतो, असे न्यायालयात सांगितले. त्याने दोन साक्षीदारसुद्धा उभे केले होते; परंतु त्याचा युक्तिवाद न्यायालयात टिकला नाही.
आरोपी घेतो कायद्याचे शिक्षण
आरोपी सागर जाधव हा शहरातील एका विधी महाविद्यालयात एलएलबी प्रथम वर्षाला शिकतो. त्याने केलेल्या कृत्यामुळे त्याचे तर आयुष्य उद्ध्वस्त झालेच, पीडित मुलाचेही आयुष्य त्याने उद्ध्वस्त केले. शिक्षा सुनावल्यानंतर सागर जाधवला पश्चात्ताप झाला होता. त्याने न्यायालयातच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.