भाडेकरू महिलेचा घरमालकाच्या जावयाकडून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 10:45 AM2020-08-03T10:45:54+5:302020-08-03T10:46:17+5:30
महिलेने डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय तायडे नामक आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : डाबकी रोडवर भाड्याच्या घरात राहणाऱ्या २८ वर्षीय विधवा महिलेचा घरमालकाच्या जावयाने विनयभंग केल्याची घटना रविवारी समोर आली आहे. महिलेने डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय तायडे नामक आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
डाबकी रोडवरील रहिवासी असलेल्या पीडित महिलेच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. सदर महिला तीन मुलांसह फडके नगरमध्ये भाड्याचे घर घेऊन राहते. ही महिला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गांधी रोड वरील एका दुकानात काम करीत आहे. या महिलेवर घरमालकाच्या जावयाची नजर पडली. हा प्रकार पीडित महिलेच्या लक्षात येताच तिने ते घर सोडले आणि दुसरीकडे घर घेतले. तिथे २९ जुलै रोजी रात्री ८ वाजता महिला मैत्रिणीसोबत बोलत असताना आरोपी संजय तायडे तेथे आला व मोबाइल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला आहे तो काढ व मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून महिलेसोबत अश्लील बोलून निघून गेला. ही घटना महिलेने आरोपीच्या पत्नीलाही सांगितली; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. आरोपी संजय तायडे हा वारंवार महिलेचा पाठलाग करीत असून, त्रास देण्याच्या उद्देशाने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे. पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी संजय तायडे याच्याविरुद्ध भारतीय दंडविधानच्या कलम ३५४ अ, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; मात्र तिला पोलीस अधिकाºयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पोलीसही दबावात असल्याचा आरोप तिने केला असून, या प्रकरणात पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी लक्ष घालण्याची मागणी महिलेने केली आहे.