डम्पिंग ग्राउंडची निविदा येत्या आठ दिवसांत - महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 03:00 PM2019-01-05T15:00:42+5:302019-01-05T15:01:25+5:30
अकोला : नायगावातील डम्पिंग ग्राउंडची समस्या आता कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी महानगरातील चारही झोनमधील डम्पिंग ग्राउंडच्या प्रकल्पास हिरवी झेंडी मिळाली ...
अकोला : नायगावातील डम्पिंग ग्राउंडची समस्या आता कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी महानगरातील चारही झोनमधील डम्पिंग ग्राउंडच्या प्रकल्पास हिरवी झेंडी मिळाली असून, येत्या आठ दिवसांच्या आत डम्पिंग ग्राउंडच्या निविदा काढल्या जातील, अशी माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी दिली. शुक्रवारी स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नायगावातील डम्पिंगमुळे नागरिक त्रस्त आहेत, याची जाणीव आपणास आहे. महानगरात चार झोनमध्ये आता डम्पिंग ग्राउंड आणि कचऱ्यापासून गॅस व खत निर्मिती सुरू होणार असून त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी २० एकर जागा दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा निधी आणि महापालिकेचा निधी मिळून हा प्रकल्प सुरू होत असून येत्या आठ दिवसांत त्याबाबतच्या निविदा काढल्या जाणार आहेत असे महापौर यांनी सांगीतले. अमृत योजनेची कामे युद्धस्तरावर सुरू आहेत. महानगरात ७०० किलोमीटर परिसरात अमृत पाणी पुरवठ्याची पाइपलाइन टाकण्याचा संकल्प आहे असेही ते म्हणाले, अर्धे शहर सध्या अंधारात आहे. त्यासाठी एलईडी असलेले पथदिवे उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला जात आहे. येत्या चार महिन्यांच्या आत महानगरात २४ हजार एलईडी लावण्याचा हा संकल्प असल्याची माहितीही त्यांनी दिली. सोबतच महानगरात १० ठिकाणी सुलभ शौचालये उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
फेरीवाला धोरण राबविणार
शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम अधिक तीव्र करणार असून त्यासाठी २५ माजी सैनिकांची भरती केली गेली आहे. अतिक्रमण हटाओ मोहिमेसोबतच फेरीवाला धोरण राबविण्यासाठी समिती गठित केली आहे, या समितीच्या माध्यमातून फेरीवाल्यांचे पुर्नवसन करणे शक्य होणार असल्याची माहितीही महापौर यांनी दिली.