विद्युत साहित्याची निविदा; शिवसेनेने झळकावले फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:33 AM2020-12-16T04:33:49+5:302020-12-16T04:33:49+5:30
अकाेला : महापालिका कार्यालयातील जुने विद्युत साहित्य काढून घेत त्याऐवजी वीज बचत करणारे नवीन साहित्य लावण्याच्या निविदेला विराेधीपक्ष शिवसेनेने ...
अकाेला : महापालिका कार्यालयातील जुने विद्युत साहित्य काढून घेत त्याऐवजी वीज बचत करणारे नवीन साहित्य लावण्याच्या निविदेला विराेधीपक्ष शिवसेनेने स्थायी समितीच्या सभागृहात मंगळवारी कडाडून विराेध दर्शविला. प्रशासनाने यापूर्वी सहावेळा निविदा प्रसिद्ध केली. २८ फेब्रुवारीच्या सभेत कमी दराची निविदा नाकारून सभागृहाने पुन्हा फेरनिविदा बाेलावण्याचा उद्देश काय ? असा सवाल उपस्थित करीत सेनेने सभागृहात भाजप व प्रशासनाच्या विराेधात फलक झळकावले. यावेळी ‘बंद करा बंद करा, भ्रष्टाचार बंद करा’ अशी घाेषणाबाजी करण्यात आली.
मनपा कार्यालयात लावण्यात आलेले पंखे, एसी, लाइट आदी विद्युत साहित्य जुने झाले असून, त्यामुळे वीजदेयकांत वाढ हाेते. त्याठिकाणी कमी वीज लागणारे अत्याधुनिक विद्युत साहित्य लावण्यासाठी शासनाकडून २५ लाख रुपयांचा निधी मनपाला प्राप्त झाला आहे. त्या आनुषंगाने विद्युत विभागाने आजपर्यंत सहावेळा निविदा प्रसिद्ध केली. सातव्यांदा मे. फुलारी इलेक्ट्रिकल अकाेला या एजन्सीने ७.०१ कमी दराची निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभागृहात सादर करण्यात आला. या प्रस्तावावरून सेनेचे गटनेता राजेश मिश्रा, नगरसेवक शशी चाेपडे यांनी प्रशासनाला व सत्तापक्ष भाजपला धारेवर धरले. यापूर्वी २८ फेब्रुवारी २०२० व २३ जून राेजीच्या स्थायी समितीच्या सभेत कमी दराची निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आली हाेती. त्यावेळी सत्तापक्षाने ठाेस कारणांशिवाय दाेन्ही वेळेस निविदा का नाकारल्या? असा सवाल राजेश मिश्रा यांनी उपस्थित करीत प्रशासन व भाजपची काेंडी केली. सभापती सतीश ढगे मिश्रा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण करून शकले नाहीत, हे विशेष. अखेर गदाराेळात या निविदेला मंजुरी देण्यात आली.
भाजप सदस्यांचे प्रश्न; प्रशासन हतबल
यापूर्वी कमी दराने प्राप्त झालेली निविदा रद्द केल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला निविदा रद्द केल्याचे पत्र दिले का? असा सवाल भाजपचे सदस्य विजय इंगळे यांनी उपस्थित केला असता, विद्युत विभागप्रमुख अमाेल डाेईफाेडे उत्तर देऊ शकले नाहीत. बऱ्याच उशिराने त्यांनी असे पत्र दिले नसल्याचे स्पष्ट केले.
मैल्यावर प्रक्रिया; सेनेकडून मतदानाची मागणी
शाैचालयातील मैल्यावर प्रकिया प्रकल्प उभारण्यासाठी मनपाने निविदा प्रसिद्ध केली असता ती तब्बल ४.१ जादा दराने प्राप्त झाली. त्यावर शिवसेनेने तीव्र आक्षेप घेत मतदानाची मागणी केली. सभापती सतीश ढगे यांनी हात उंचावून मतदान घेतले असता भाजपच्या बाजूने दहा तसेच सेनेच्या बाजूने तीन मते हाेती. काॅंग्रेसच्या नगरसेविकेने सेनेच्या बाजूने तसेच वंचित आघाडीच्या नगरसेविका किरण बाेराखडे यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले, हे विशेष.