मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी निविदा
By admin | Published: April 11, 2017 01:38 AM2017-04-11T01:38:08+5:302017-04-11T01:38:08+5:30
स्वाइन फ्लूचे सावट; महापौरांचे प्रशासनाला निर्देश
अकोला: डुकरांच्या माध्यमातून मानवी शरीरावर हल्लाबोल करणार्या एच-१, एन-१ या विषाणूंपासून स्वाइन फ्लू होत असल्यामुळे शहरातील मोकाट डुकरांना पकडण्यासाठी निविदा प्रकाशित करण्याचे निर्देश सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला दिले. वराहपालन करणार्यांनी आडकाठी निर्माण केल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी दाखल करण्याची महापौरांची स्पष्ट सूचना आहे. प्रशासन महापौरांची सूचना कितपत गांभीर्याने घेते, हे लवकरच दिसून येणार आहे. स्वाइन फ्लूसाठी कारणीभूत ठरणार्या एच-१, एन-१ या विषाणूंचे डुकरांच्या माध्यमातून संक्रमण होते. डुकरांना या विषाणूचा वाहक मानल्या जाते. या आजारासाठी थंडीचे दिवस पोषक मानले जात असले तरी आता ऐन कडाक्याच्या उन्हात स्वाइन फ्लूचा प्रसार झपाट्याने होत आहे. बाळापूर तालुक्यातील पारस येथे स्वाइन फ्लूचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून उर्वरित दहा रुग्ण शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात या आजाराचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे दिसून येते. मागील आठ दिवसांत प्रभाग क्रमांक १५ मध्ये आठ ते नऊ डुकरांचा अचानक मृत्यू झाल्याचे समोर आले. मोकाट डुकरांमुळे अस्वच्छतेला हातभार लागत असल्यामुळे वराहपालन करणार्या व्यावसायिकांनी त्यांची डुकरे शहराबाहेर हलविण्याचा प्रस्ताव मनपाच्या सभागृहात मंजूर करण्यात आला होता. आयुक्त अजय लहाने यांनी क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षकांसह वराहपालन करणार्या व्यावसायिकांना स्पष्ट निर्देश देत डुकरांचा बंदोबस्त करण्याचे बजावले होते. पुढे काहीही झाले नाही. मोकाट डुकरांना पकडण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याचे पाहून तसेच स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापौर विजय अग्रवाल यांनी डुकरांना पकडण्याचा कंत्राट देण्यासाठी निविदा प्रकाशित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.