दहावी निकाल सुधार प्रकल्पाची अकोल्यात सुरुवात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 10:22 AM2019-11-06T10:22:23+5:302019-11-06T10:22:54+5:30
दहावी निकाल सुधार प्रकल्प सुरू केला असून, राज्यातील हा पहिला प्रयोग आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: इयत्ता दहावीची घसरत चाललेली टक्केवारी लक्षात घेता, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी आणि निकालाची टक्क्यात वाढ व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेत, दहावी निकाल सुधार प्रकल्प सुरू केला असून, राज्यातील हा पहिला प्रयोग आहे. मंगळवारी मुख्याध्यापकांनी दहावीचा निकाल वाढविण्याबाबतचे सादरीकरण सीईओ आयुष प्रसाद यांच्यासमोर सादर केले.
यावर्षी इयत्ता दहावीचा निकाल विभागात सर्वात कमी लागला आहे. दहावी निकालाची घसरलेली टक्केवारी चिंताजनक आहे. पुढील निकालात दहावीची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेतला आहे. सीईओ आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या समन्वयातून दहावी निकाल सुधार प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत इयत्ता दहावीचा १00 टक्के निकाल आणि शाळा गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापकांचे व्हिजन काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मुख्याध्यापकांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. दहावीचा निकाल कसा वाढवायचा, याचे सादरीकरण जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना सीईओ आयुष प्रसाद यांच्यासमोर करायचे आहे. मंगळवार, ५ नोव्हेंबरपासून त्याची जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात सुरुवात झाली. यावेळी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, विभागीय शिक्षण मंडळ सदस्य प्रा. नरेंद्र लखाडे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष बळीराम झामरे, जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व व्यावसायिक विकास संस्थेच्या प्रतिनिधी कविता बोरसे, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव, डॉ. साबीर कमाल आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)