मनपाच्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:18 AM2021-03-18T04:18:12+5:302021-03-18T04:18:12+5:30
मागील दीड महिन्यापासून शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र समाेर आले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला आहे. ...
मागील दीड महिन्यापासून शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र समाेर आले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला आहे. काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी चाचणी केंद्र सुरू केले आहेत. चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. अशा संकटसमयी मनपाच्या वैद्यकीय आराेग्य यंत्रणेने चाेवीस तास दक्ष राहणे अपेक्षित आहे. अशा स्थितीत वैद्यकीय विभागातील काही अधिकारी व कर्मचारी कर्तव्याला दांडी मारत असल्याची बाब महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी केलेल्या पाहणीदरम्यान उजेडात आली आहे. आयुक्त अराेरा यांनी अशाेक नगरस्थित नागरी आराेग्य केंद्राची आकस्मिक पाहणी केली असता वैद्यकीय अधिकारी डाॅ. वासीक अली अनुपस्थित असल्याचे आढळून आले. याप्रकरणी आयुक्तांनी खातरजमा केली असता सायंकाळी ४ वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर हजर असणे क्रमप्राप्त असल्याची बाब समाेर आली. यासंदर्भात डाॅ. अली यांना कारणे दाखवा नाेटीसही बजावण्यात आली हाेती. डाॅ. अली यांनी ासादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्यामुळे आयुक्त निमा अराेरा यांनी डाॅ. अली यांची सेवा संपुष्टात आणण्याचा आदेश जारी केला. आयुक्तांच्या निर्णयामुळे मनपाच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पदाधिकाऱ्यांच्या दालनात खलबते
मानसेवी वैद्यकीय अधिकारी डाॅ. वासीक अली यांची सेवा संपुष्टात आणल्याचा आदेश तयार हाेताच यासंदर्भात सायंकाळी महापालिकेत विराेधी पक्षनेता साजीद खान पठाण यांच्या दालनात खलबते पार पडल्याची माहिती आहे. काेराेना काळात नागरी आराेग्य केंद्र बंद ठेवण्याच्या बाबीकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
नागरी आराेग्य केंद्रात शुकशुकाट
मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी अशाेक नगरस्थित नागरी आराेग्य केंद्राची आकस्मिक पाहणी केली असता, या ठिकाणी काेणताही अधिकारी अथवा कर्मचारी हजर नसल्याचे आढळून आले हाेते. यावरून मनपाचा वैद्यकीय विभाग अजिबातही गंभीर नसल्याचे चित्र समाेर आले.