हुंडीचिठ्ठी दलालांच्या दहशतीने कॉन्ट्रॅक्टर अज्ञातस्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:40 PM2018-11-02T12:40:55+5:302018-11-02T12:41:02+5:30
अकोला : अनधिकृतरीत्या चालत असलेल्या हुंडीचिठ्ठी या व्याजाच्या व्यवसायातील दलालांनी गुंडांना सोबत घेऊन अकोल्यातील काही व्यापारी व उद्योजकांना धमक्या दिल्याने अकोल्यातील मोठे कॉन्ट्रॅक्टर राम देवानी व त्यांच्यासह सात ते आठ मोठे उद्योजक व व्यापारी हुंडीचिठ्ठी दलालांच्या दहशतीने अकोल्यातून काढता पाय घेत अज्ञातस्थळी वास्तव्यास गेल्याची माहिती आहे
- सचिन राऊत
अकोला : अनधिकृतरीत्या चालत असलेल्या हुंडीचिठ्ठी या व्याजाच्या व्यवसायातील दलालांनी गुंडांना सोबत घेऊन अकोल्यातील काही व्यापारी व उद्योजकांना धमक्या दिल्याने अकोल्यातील मोठे कॉन्ट्रॅक्टर राम देवानी व त्यांच्यासह सात ते आठ मोठे उद्योजक व व्यापारी हुंडीचिठ्ठी दलालांच्या दहशतीने अकोल्यातून काढता पाय घेत अज्ञातस्थळी वास्तव्यास गेल्याची माहिती आहे; मात्र त्यांचे कुटुंबीयही अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याने उद्योजक वर्तुळात शंका-कुशंका व्यक्त करण्यात येत आहेत.
अकोल्यात बिल्डर व्यवसायात भरारी घेतलेल्या राम देवानी यांनी राष्ट्रीय महामार्गाचा काही अंतराचा कंत्राट घेतला होता. यासाठी त्यांनी कोट्ट्यवधी रुपयांची रक्कम या महामार्गाच्या बांधकामात गुंतविली. त्यानंतर कामाचे देयक निघणार असतानाच राष्ट्रीय महामार्गाचे कामकाज बंद झाले. या काम बंदमुळे राम देवानीसह आणखी काही कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले. त्यांनी रस्त्याच्या बांधकामासाठी हुंडीचिठ्ठी दलालांकडून घेतलेली रक्कम परत करण्यास मोठे संकट आल्याने काही दिवसांचा कालावधी मागितला; मात्र पैशाची जुळवाजुळव होत नसल्याने देवानी यांनी दलालांना पैसे परत करण्याची हमी देत काही महिन्यांचा कालावधी मागितला. अशातच त्यांच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निवासस्थानी जाऊन काही हुंडीचिठ्ठी दलालांनी गुंडांना सोबत घेऊन धमक्या दिल्या. त्यामुळे राम देवानी अनेक दिवसांपासून अज्ञातस्थळी असून, त्यांचे कुटुंबीयही अकोल्यात दिसत नसल्याची माहिती आहे. देवानीसह आणखी काही कंत्राटदार, उद्योजक व व्यापारी हुंडीचिठ्ठी दलालांच्या दहशतीने अकोल्यातून गायब झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
तीन टक्क्यांच्यावर व्याजदर
हुडीचिठ्ठी दलालांनी तब्बल तीन टक्के ते त्यापेक्षाही व्याजदर आकारला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे भरमसाट व्याज आकारणाऱ्या दलालांचीही चौकशी करण्याची मागणी व्यापारी व उद्योजकांनी केली आहे. आर्थिक अडचणीत असल्याने व्यापारी व उद्योजक पैसे देण्यास वेळ करीत असल्याची माहिती आहे.
दहशतीने घाबरल्याने पोलीस तक्रार नाही!
हुंडीचिठ्ठीच्या व्यवसायात आता गुंडांचा शिरकाव झाल्याने व्यापारी व उद्योजक दहशतीत आहेत. वारंवार गायब करण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे राम देवानीसह काही व्यापाºयांनी पोलीस तक्रार केली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पोलीस तक्रारीसाठी ठाण्यापर्यंत पोहोचलेल्यांनाही ठाण्यातून परत बोलाविण्यात आले. हुंडीचिठ्ठीचे पैसे घेतलेल्यांनी पैसे परत करण्यासाठी वेळ मागितला आहे; मात्र तो मिळत नसल्याने आपसात वाद वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.