तेरवीला तिलांजली; स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रासाठी मदत
By admin | Published: September 3, 2016 02:12 AM2016-09-03T02:12:37+5:302016-09-03T02:12:37+5:30
नवा पायंडा: मळसूरच्या देवकते कुटुंबीयांचा निर्णय.
अतुल जयस्वाल
अकोला, दि. २: मनुष्य जन्मभर रुढी, परंपरा आणि कर्मकांडाच्या फेर्यात अडकलेला असतो. इहलोकाची यात्रा संपवल्यानंतरही त्याची या फेर्यातून मुक्तता होत नाही. देह ठेवल्यानंतरही तेरवी, दसवा यासारख्या पारंपरिक विधीच्या जोखडातून माणसाची मुक्ती नाही. शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरा अजूनही सुरूच आहेत. पातूर तालुक्यातील मळसूर येथील देवकते कुटुंबीयांनी मात्र तेरवीसारख्या रुढी, परंपरेला तिलांजली दिली आहे. वडिलांची तेरवी न करता त्यासाठी होणारा खर्च स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारण्यासाठी सत्कारणी लावण्याचा निर्णय घेऊन विठ्ठल देवकते यांनी एक नवा पायंडा पाडला आहे.
मळसूर हे पातूर तालुक्यातील आडवळणाचे एक गाव. अतिशय दुर्गम भागात असलेले या गावातील लोक जुन्या विचारांचे. या गावात शिकून मोठे झालेले मनपाचे सहायक माहिती अधिकारी विठ्ठलराव देवकते यांचे वडील संपतराव देवकते यांचे ३१ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. अंत्यविधीनंतर देवकते कुटुंबीय एकत्र बसले. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तेरवी, दसवा हे विधी ठरलेलेच. देवकते कुटुंबातील प्रमुख या नात्याने विठ्ठलराव देवकते यांनी वडिलांची तेरवी न करता तो खर्च स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यासाठी सत्कारणी लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय आप्त स्वकीयांना बोलून दाखविला. सर्व कुटुंबीयांनी तो निर्णय मान्य केला. तेरवीसाठी साधारणपणे २५ ते ३0 हजार रुपयांचा खर्च गृहित धरून त्या पैशातून गावातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी सोपीनाथ संस्थानचे अध्यक्ष दिलीप काळे यांनीही मंदिराच्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.
विठ्ठल देवकते हे युवा राष्ट्र या संघटनेशी जुळलेले आहेत. संघटनेचे धनंजय मिश्रा व इतर सदस्यांनी अभ्यास केंद्र उभारण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले.