अमित-प्रतीक्षा हत्याकांडाची मुख्य साक्ष आटोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:18 PM2019-04-13T13:18:41+5:302019-04-13T13:18:50+5:30
राज्यभर गाजलेल्या या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणाची सुनावणी तब्बल ११ वर्षांनंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलँड यांच्या न्यायालयात सुरू झाली असून, शुक्रवारी या प्रकरणातील दुसऱ्या मुख्य साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली.
अकोला - गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात अमित-प्रतीक्षा यांना बांधून ठेवून मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर हत्याकांड करण्यात आले होते. राज्यभर गाजलेल्या या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणाची सुनावणी तब्बल ११ वर्षांनंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलँड यांच्या न्यायालयात सुरू झाली असून, शुक्रवारी या प्रकरणातील दुसऱ्या मुख्य साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. पाच ते सहा तास या साक्षीदाराची तपासणी करण्यात आली.
जुने शहरातील अमित आणि त्याची मैत्रीण प्रतीक्षा हे दोघे जण शिकवणी वर्ग आटोपल्यानंतर गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात १४ जून २००८ रोजी दुचाकीने जात होते. अमित-प्रतीक्षा दोघेही बसलेले असताना मनिष श्रीकृष्ण खंडारे रा. डाबकी रोड, हुसेन खा सुजात खा रा. गायगाव, नितीन देवराव मोरे रा. डाबकी रोड, इमाम खा सुजात खा रा. गायगाव, गुलाम आबीद गुलाम मुस्तफा रा. गायगाव, अब्दुल आरीफ अब्दुल वहाब, मंगेश भगेवार, मोहसीन खा ऊर्फ मिठ्ठू, आसीफ खा शेख अहमद ऊर्फ फकीरा शेख महेमुद, हरिदास बिल्लेवार, शेख हबीब ऊर्फ कल्या शेख मजीद, चंदन वाकोडे व शेख जहीर शेख अमीर या १३ नराधमांनी अमितला दोराने बांधून ठेवत प्रतीक्षावर सामूहिक बलात्कार करून दोघांचीही हत्या केली होती. त्यानंतर दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून ते आत्महत्या करीत असल्याचा बनाव केला होता. यामधील हुसेन खा सुजात खाने आत्महत्या करीत असल्याची खोटी सुसाईड नोटही तयार केली होती. याप्रकरणी उरळ पोलिसांनी १३ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलँड यांच्या न्यायालयात सुरू झाली असून, ५ मार्च रोजी एका साक्षीदाराची तपासणी करण्यात आली तर शुक्रवारी दुसºया मुख्य साक्षीदाराची साक्ष तपासण्यात आली. त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी मुख्य साक्षीदाराची उलट तपासणी केली. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सदर साक्षीदाराची साक्ष आणि आरोपींच्या वकीलांची उलट तपासणी तब्बल पाच ते सहा तास चालली. या प्रकरणातील पुढील सुनावणी २२ मे रोजी राहणार असल्याची माहिती आहे.