बसस्थानकावर ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींच्या चाचण्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 11:26 AM2020-12-11T11:26:42+5:302020-12-11T11:30:33+5:30
Akola News आरोग्य विभागामार्फत बसस्थानकांवरही सुपर स्प्रेडर व्यक्तींचे नमुने संकलित केले जात आहेत.
अकोला: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या व्हाव्यात या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत बसस्थानकांवरही सुपर स्प्रेडर व्यक्तींचे नमुने संकलित केले जात आहेत; मात्र चाचण्यांपासून बचावासाठी अनेक जण पळवाटा काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाला राेखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन कोरोना चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. बाजारपेठेसह जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली असून, या ठिकाणी क्वचितच लोक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत असून, मास्क वापरत आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषगांने आरोग्य विभागामार्फत तालुकास्तरावर सर्वच बसस्थानकावर विशेष माेहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करण्याचे उद्दिष्ट आराेग्य विभागाचे आहे; मात्र अनेक लोक पळपाटा शोधण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहेत.
एकाची चूक पडू शकते अनेकांवर भारी
कोरोनाचा फैलाव होऊन नये म्हणून विविध स्तरावर प्रयत्न केले जात असले, तरी काही लोक बेफिकिरीने वावरताना दिसून येत आहेत. विशेषत: ज्या लोकांचा अनेकांशी संपर्क येतो, असे लोक चाचण्यांपासूनही पळ काढताना विशेष मोहिमेंतर्गत दिसून आले. यातील कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती या इतरांसाठीही धोकादायक ठरत आहे.
ज्या लोकांचा अनेकांशी संपर्क येतो, अशा ‘सुपर स्पेडर’ व्यक्तींनी कोविड चाचणी करून घ्यावी. त्यासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. चाचणीपासून पळ काढणे हा कोरोनापासून बचाव ठरू शकत नाही. त्यामुळे या उपक्रमात नागरिकांनी जबाबदारी म्हणून सहभागी व्हावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला