बनावट सोने; व्यापाऱ्यास २.५० लाखांचा गंडा!
By admin | Published: July 14, 2017 01:26 AM2017-07-14T01:26:37+5:302017-07-14T01:26:37+5:30
अकोला : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील भांडे व्यापाऱ्याला नकली सोने देऊन अडीच लाख रुपयांनी गंडविल्या गेल्याची घटना १२ जुलै रोजी टॉवर चौकामध्ये घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील भांडे व्यापाऱ्याला नकली सोने देऊन अडीच लाख रुपयांनी गंडविल्या गेल्याची घटना १२ जुलै रोजी टॉवर चौकामध्ये घडली.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील भांडे व्यापारी नारायण साबू यांना एका भामट्याने केवळ अडीच लाख रुपयांमध्ये दोन किलो सोने देण्याचे आमिष दिले. सदर व्यापारी भामट्याच्या आमिषाला बळी पडत त्याने अडीच लाख रुपये देऊन सोने खरेदीचा सौदा पक्का केला. त्यानुसार १२ जुलै रोजी टॉवर चौकात सदर व्यापारी अडीच लाख रुपये घेऊन आला.व्यापाऱ्याने अडीच लाख रुपये देताच या भामट्याने बनावट सोने त्यांच्या हातात ठेवून पळ काढला. सदर भामट्याने या व्यापाऱ्यास मला सोन्याची वस्तू काम करीत असताना सापडली आहे. ती मला तुम्ही विकून द्या, अशी विनवणी केली. त्यानुसार व्यापाऱ्याने ते सोने घेऊन सोनाराकडे चाचपणी केली असता ते सोने नसून पितळ असल्याचे समोर आले. फसविणारा व्यक्ती याआधी दोन-तीन वेळा दुकानावर भांडे घेण्यासाठी आल्याचे तक्रारकर्त्याने सांगितले आहे. व्यापाऱ्याला स्वत:ची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने रामदासपेठ पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नकली सोने देऊन अडीच लाख रुपये घेऊन पोबारा करणाऱ्या व्यक्तीचे नाव रमेश दलपत असून, तो राजस्थानमधील रहिवासी असल्याचे फसवणूक झालेला व्यापारी पोलिसांना सांगत आहे.