साथीच्या तापाचे अकोला जिल्हय़ात थैमान
By admin | Published: September 22, 2015 01:39 AM2015-09-22T01:39:55+5:302015-09-22T01:39:55+5:30
स्वाइन फ्लूचेही दोन संशयित रुग्ण, डायरिया, मलेरिया व तापाने रुग्ण बेजार.
अकोला: चार-पाच दिवसांपूर्वी पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे जिल्हय़ासह शहरात व्हायरल फिवरची साथ पसरली असून, डायरिया, मलेरिया व तापाने रुग्ण बेजार झाले आहेत. खासगी दवाखान्यांसह सर्वोपचार रुग्णालयामध्ये गत आठवड्यापासून चांगलीच गर्दी वाढली आहे. गत आठवड्यात जिल्हय़ात सर्वत्र आलेल्या पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाल्याने, नागरिकांना सर्दी, खोकला, तापासह डायरिया, मलेरिया, कावीळ, अतिसार, त्वचारोगसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहेत. ग्रामीण भागात तर दूषित पाण्यामुळे डायरियाने डोके वर काढले आहे. शहरी भागात डासांचा प्रादरुभाव वाढल्याने मलेरिया आजाराने रुग्ण बेजार झाले आहेत. लहान मुलांसोबतच मोठय़ा माणसांनासुद्धा सर्दी, खोकला, तापासारखा आजार जडला असून, रुग्ण उपचारासाठी शहरातील दवाखान्यांमध्ये धाव घेत आहेत. सद्यस्थितीत शहरातील प्रत्येक दवाखाना आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णांची हाऊसफुल्ल गर्दी दिसून येत आहे. सर्वोपचार रुग्णालयामध्येसुद्धा रुग्णांची गर्दी वाढली आहे. पावसामुळे ठिकठिकाणी नाल्या, गटारे तुंबलेल्या आहेत. कचर्याचे ढीग साचले आहेत. अनेक भागांमध्ये नाल्याच नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. हे अस्वच्छ व घाण पाणी खुल्या भूखंडामध्ये शिरते. या साचलेल्या पाण्यामध्ये मोठय़ा प्रमाणात डासांची उत्त्पत्ती वाढली आहे. त्यामुळे साथीचे आजारासह मलेरिया, डायरियाने पीडित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील अस्वच्छतेमुळे मलेरिया, डायरिया, टायफाइडचे रुग्ण वाढतच आहेत. मनपा व जि.प. आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
*स्वाइन फ्लूचे दोन संशयित रुग्णही आढळले
स्वाइन फ्लूसारख्या जीवघेण्या आजाराने पुन्हा डोके वर काढले असून, नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सर्वोपचार रुग्णालयात भरती झालेल्या दोन रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचा संशय आहे. हे दोन्ही रुग्ण जिल्हय़ाबाहेरील आहेत. वाशिममधील चामुंडानगरातील साक्षी राम शर्मा (६) आणि बुलडाणा जिल्हय़ातील डोंगरखंडाळा येथील शेषराव परशराम थोरात यांचा समावेश आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जिल्हय़ाबाहेरील पाच मुली व जिल्हय़ातील लाखपुरी येथील एक चिमुकला स्वाइन फ्लूने बाधित असल्याचे आढळून आल्यावर या सहाही जणांवर उपचार करून त्यांना सर्वोपचारमधून सुटी देण्यात आली.