‘हिट अँण्ड रन’ कायद्याप्रकरणी आंदोलन होणार अधिक तीव्र
By रवी दामोदर | Published: January 9, 2024 05:03 PM2024-01-09T17:03:35+5:302024-01-09T17:03:45+5:30
अकोला जिल्हा मोटार मालक-चालक असोशिएशनचा पत्रकार परिषदेतून इशारा
अकोला : देशभरामध्ये ‘हिट अँण्ड रन’ या कायद्यासंदर्भात आंदोलन सुरू आहे, केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे मंगळवार, दि.९ जानेवारीपासून ‘हिट अँणड रन’ कायद्याविरोधात चालक स्टेअरींग सोडून आंदोलन करणार असून, देशभरात हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याची माहिती अकोला जिल्ह्यातील अकोला जिल्हा मोटार मालक-वाहक असोसिएशन अध्यक्ष जावेद खान पठाण यांनी दि.९ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारने देशभरातील २५करोड वाहनचालकांचे संघटनांसोबत चर्चा करावी, तसेच सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणीही याप्रसंगी असोसिएशनच्यावतीने करण्यात आली. आगामी आंदोलन शांततेच्या तसेच लोकशाही मार्गाने सुरू ठेवले जाणार आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा व कुठेही रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशा प्रकारचे वर्तन होणार नसल्याचेही माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. केंद्र सरकारने मागणी मान्य न केल्यास चक्काजाम देखील करण्याची तयारी केल्याचा इशारा त्यांनी पत्रपरिषदेत दिला. यावेळी अकोला जिल्हा मोटार मालक-वाहक असोसिएशनचे अध्यक्ष जावेद खान पठाण, शहराध्यक्ष गुड्डू सेठ, अकोला ड्रायव्हर असोसिएशन अध्यक्ष सैयद वसीम आदी उपस्थित होते.